महापालिकेची तयारी
केरळमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सावधगिरीचा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनेही त्या दृष्टीने तयारी केली आहे.
कोठे होणार चाचणी?
पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा म्हणाले, ‘पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमधून करोना चाचणी केली जाणार आहे. तसे आदेश सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत करोना चाचणी केली जाणार आहे. मेल्ट्रॉन हॉस्पिटल आणि ईओसी पदमपुरा या ठिकाणी मात्र रात्री आठपर्यंत करोना चाचणी केली जाणार आहे. महापालिका सध्या करोना चाचणीवर भर देत आहे.’
कोविव्हॅटचे दोनशे डोस
पालिकेकडे सध्या इन-कोविव्हॅटच्या दोनशे लशींचा साठा शिल्लक आहे. प्रिकॉशन डोस म्हणून १८ वर्षांवरील नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. त्याशिवाय पालिकेने कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन व कोब्रोव्हॅक्स लशीची मागणी सरकारकडे केली आहे.
‘सावधगिरी हवी, भीती नको’
नवी दिल्ली : देशात करोना विषाणूचा आढळलेला नवा प्रकार आणि नव्या करोनारुग्णांची वाढत असलेली संख्या या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याच वेळी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मात्र, घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. केरळ, महाराष्ट्र, झारखंड आणि कर्नाटक या राज्यांत दैनंदिन करोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ नोंदवली जात असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
Read Latest Maharashtra News And Marathi News