हायलाइट्स:
- चंद्रकांत पाटलांकडून भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
- कार्यकर्त्यांना दिल्या आक्रमक होण्याच्या सूचना
- महाविकास आघाडीवर पुन्हा बोचरी टीका
सांगली : ‘सत्तेतील तीन पक्ष आणि त्यांचा शिरोमणी संजय राऊत हे खोटे बोल पण रेटून बोल, असा इको दररोज तयार करत असतात. त्यासाठी आता भाजपही त्यांच्या इकोला सडेतोड असा इको तयार करत आहे. सरकारला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना आक्रमक व्हावे लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे लक्षात ठेवावं,’ असा कानमंत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. सांगली येथे शुक्रवारी भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
हे सरकार केवळ पोलीस आणि गुंडांच्या बळावरच चाललं आहे, अशी बोचरी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात एक वकिलांची फौज तयार करा. हे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जीवावर सुरू आहे. मुंबईमध्ये एक अदृश्य वकिलांची टीम काम करत आहे. त्यामुळे सरकारमधील लोक घाबरले आहेत. त्यांना कळेनासे झालं आहे. कायद्याचा दबाव सुरू करा. केसेस जास्तीत जास्त दाखल झाल्याने त्याचे राजकारणातले कॅरेक्टर सर्टिफिकेट तयार होते. गेल्या २२ महिन्यात आम्ही त्यांना कोर्टात एकही केस जिंकू दिली नाही. हे तीन पक्ष शेवटचा प्रयोग म्हणून तडफड करत आहेत. कोणीतरी सल्लागार चुकीचा असल्याने ते सर्व ठिकाणी कोर्टात मारच खाणार आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.
राज्यात जिथे जिथे भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात, त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उलटे गुन्हे, तक्रारी दाखल कराव्यात, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. नाशिकमधील प्रकरणानंतर सामनाच्या संपादकांवर चार तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर संजय राऊत यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. असा उलटा दबाव तयार करावा लागणार, असं ते म्हणाले.
‘ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नसतानाही सरकार ग्रामपंचायत निवडणुका घेऊ पाहत आहे. याबाबत आम्ही राज्यभर इको तयार करू. आधी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवा. यानंतर निवडणुका घ्या, अशी आमची भूमिका आहे,’ असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, भाजप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आदी उपस्थित होते.