हायलाइट्स:
- आज १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के
- ३३०१ करोना बाधित बरे होऊन परतले घरी
मुंबई : राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असला तरी दिवसागणिक आढळणारी रुग्णसंख्या ५ हजारांच्या आसपास स्थिरावली आहे. मागील दोन दिवसांत राज्यात ५ हजारांहून जास्त नवे करोना रुग्ण आढळत होते. मात्र आज ही संख्या काहीशी कमी झाली असून गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ६५४ नवीन करोना बाधितांचं (Maharashtra Corona Cases Today) निदान झालं आहे.
महाराष्ट्रात आज शुक्रवारी १७० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर ३३०१ करोना बाधित बरे होऊन घरी परतले आहेत. याबाबत आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.
राज्यात आज १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३२,५६,०२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,४७,४४२ (१२.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९२,७३३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २,३३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
सध्या राज्यातील पुणे, ठाणे, सातारा, सांगली आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक अॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत.
दरम्यान, करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला असताना राज्यात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असून प्रशासन सतर्क झालं आहे. सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीसह काही जिल्ह्यांमध्ये जमावबंदीची घोषणा करण्यात आली आहे.