हायलाइट्स:
- चंद्रकांत पाटील यांची ठाकरे सरकारवर टीका
- जयंत पाटील यांनी दिलं प्रत्युत्तर
- सरकार पाच वर्षे हलणार नसल्याचाही केला दावा
सांगली : पोलीस आणि गुंडांच्या बळावर सरकार चालवलं जात आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘मुख्यमंत्र्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. राज्यात कुठेही गुंडगिरी होत नाही. पोलीस त्यांचे काम करत आहेत. आता सरकार पाच वर्षे हलणार नसल्याची खात्री पटल्याने पोलीस आणि प्रशासन विरोधकांचे ऐकत नाहीत. यामुळे चंद्रकांत पाटील निराश आहेत. या निराशेतून तुम्ही अशी वक्तव्ये अधून-मधून ऐकत राहाल,’ असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. ते शुक्रवारी आष्टा येथे बोलत होते.
आष्टा येथील भाजपचे नेते वैभव शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. राज्यात कुठेही गुंडगिरी होत नाही. पोलीस त्यांचे काम करत आहेत. सरकार पाच वर्षे हलणार नाही, याची खात्री पटल्याने पोलीस व अधिकारी विरोधकांचे ऐकत नाहीत. या निराशेतून चंद्रकांत पाटील पोलिसांवर राग व्यक्त करीत आहेत. त्यांची निराशा अशी अधून-मधून व्यक्त होत राहील.
‘भाजपमधील अनेकजण पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर’
‘महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना निधीच्या माध्यमातून त्रास देण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. एकनाथ खडसे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर दबाव टाकून काहीच निष्पन्न होणार नाही,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परत येण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकांशी बोलणे सुरू असून, योग्य वेळी ते राष्ट्रवादीत परततील अशी त्यांनी माहिती दिली. आष्टा येथील वैभव शिंदे यांनी पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शुक्रवारी ते पुन्हा राष्ट्रवादीत परतले. शिंदे यांच्याप्रमाणे अनेक जण परतीच्या वाटेवर असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितलं आहे.