येत्या २४ डिसेंबर रोजी पासून मुंबई येथे आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या आंदोलनाला अनेक जिल्ह्यातील मराठा बांधव हजारोच्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. गावा गावातून मराठा बांधव ट्रॅक्टरने पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र या दरम्यान ट्रॅक्टरमुळे वाहतुकीला अडथळा होऊ शकतो, लोकांची गर्दी होऊ शकते आणि जाळपोळ, गाड्या फोडणे असे अनुचित प्रकार घडू शकतात. त्यामुळे खबरदारी म्हणून कंधार पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे.
आंदोलनासाठी कोणी ट्रॅक्टर मागितल्यास देऊ नये, ट्रॅक्टरचा शेती साठी उपयोग करा, असं देखील नोटीस मध्ये सांगण्यात आलं आहे. आंदोलनाला ट्रॅक्टर घेऊन गेल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी किती जणांना नोटीस दिली याबाबत माहिती समजू शकली नाही, पण अशा नोटीस मिळाल्यानं सकल मराठा समाजा तर्फे नाराजी व्यक्त केली जातं आहे.
शांतता समितीच्या बैठकीत मराठा सेवक आक्रमक
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनच्या सभागृहात जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस उप महानिरिक्षक शशिकांत महावरकर, पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदींच्या उपस्थितीत २४ डिसेंबरच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी मराठा सेवकांनी आपले मानोगत व्यक्त केले. टॅक्टर मालकांना नोटीस बजावल्याचा मुददही उपस्थित केला. तो कारवाईचा एक भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
मनोज जरांगे यांनी व्यक्त केला तीव्र संताप
मराठा आंदोलकांना पोलिसांकडून बजावण्यात येणाऱ्या कायदेशीर नोटीसांवर मनोज जरांगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आंदोलकांना नोटीसा बजावून सरकारने मराठा समाजाचा रोष ओढवून घेऊ नये. उलट सरकारने कुणबी नोंदी कमी सापडल्याप्रकरणी मराठवाड्यातील कामचुकार व जातीयवादी अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी, असे ते म्हणालेत. पोलिसांनी नांदेडमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यासाठी निवेदन देण्यास गेलेल्या मराठा बांधवांना नोटीसा बजावल्या. हे अत्यंत चुकीचे आहेत. त्यांच्या दारात ट्रॅक्टर उभे आहेत म्हणून तुम्ही त्यांना नोटीस बजावत आहात. मग आता त्यांनी ते विकून टाकावे का? अशा नोटीसा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सरकारने तत्काळ निलंबित करावे, असे मनोज जरांगे माध्यमांशी बोलताना म्हणाले. पोलिसांनी बीडच्या इशारा सभेच्या आयोजकांना नोटीसा बजावू नये,असे करून सरकारने समाजाचा रोष ओढवून घेऊ नये, असं ही जरांगे यावेळी म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News