सागरी किनारा मार्ग हा मरिन ड्राइव्ह ते वरळी-वांद्रे सी लिंक असा १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दक्षिण मुंबईतील वाहतूक सुरळीत होणार आहे. तसेच ३४ टक्के इंधन बचत आणि ७० टक्के वेळेची बचतही होणार आहे. मरिन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क पहिला टप्पा, प्रियदर्शनी पार्क ते लोग्रो नाला दुसरा टप्पा आणि लोग्रो नाला ते वरळी सी लिंक असा तिसरा टप्पा असून, त्यांचे काम सुरू आहे. फेब्रुवारीत पहिला टप्पा आणि उर्वरीत काम मे, २०२४पर्यंत काम पूर्ण करून किनारा मार्गावरील वाहतूक सुरू करण्याची योजना आहे. मरिन ड्राइव्ह उड्डाणपुलाच्या सिग्नलनंतर ५० मीटर अंतरावर सागरी किनारा मार्गावर वाहनचालकांना पोहोचता येईल व त्यानंतर वरळी सी लिंक गाठता येणार आहे.
वाहनचालकांना ग्रॅण्ट रोड, चर्नी रोड व नंतर पुढे मरिन ड्राइव्हपर्यंत जाऊन सागरी किनारा मार्गावर पोहोचता येईल. हा मोठा वळसा घ्यावा लागणार असल्याने चर्नी रोडपासून मरिन ड्राइव्हपर्यंत बोगदा बांधण्याची योजना मुंबई महापालिकेने आखली आहे. त्यामुळे वाहनचालकांना सागरी किनारा मार्गावर प्रवेशासाठी मरिन ड्राइव्हपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. चर्नी रोड येथील पोलिस जिमखाना व हिंदू जिमखाना येथून बोगद्यातून जाऊन स. का. पाटील उद्यानाकडून पुढे मरिन ड्राइव्हला बाहेर पडता येईल. ज्यांना चर्नी रोडच्या बाजूने सागरी किनारा मार्गावर प्रवेश करायचा आहे, त्यांच्यासाठी हा बोगदा उपयुक्त ठरणार आहे.
चर्नी रोडपासून मरिन ड्राइव्ह सागरी किनारा मार्गाला जोडण्यासाठी बोगदे उभारण्याची पालिकेची योजना आहे. मात्र त्यासाठी तांत्रिक व्यवहार्यतेचा अभ्यास केला जात आहे. किनारा मार्ग प्रकल्प, सेवा वाहिन्या आणि मेट्रो ३च्या कामावर परिणाम न करता हा बोगदा तयार होऊ शकतो का हे तपासले जात आहे. – पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), मुंबई महापालिका
पालिकेकडून तपासणी
सध्या सागरी किनारा मार्गाला समांतर असेच भूमिगत मेट्रो ३चे काम सुरू आहे. त्यामुळे बोगद्याची उभारणी करताना मेट्रो ३ला आणि सागरी किनारा मार्गाच्या बांधकामातही काही समस्या येणार नाही, याबाबतची तपासणी मुंबई महापालिकेकडून सुरू आहे.