‘एमटीएचएल’ हा प्रामुख्याने दक्षिण मुंबईला रायगडमधील जवाहरलाल नेहरू बंदर, बांधकामाधीन नवी मुंबई विमानतळ यांच्याशी जोडणारा मार्ग आहे. यामुळे दीड ते दोन तासांचे अंतर जेमतेम अर्ध्या तासावर येणार आहे. ‘हा मार्ग डिसेंबरमध्ये सुरू झाल्यानंतर रायगडमध्ये तिसरी मुंबई उभी होईल’, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता. परंतु, डिसेंबरमध्ये हा मार्ग सुरू होणे अशक्य दिसत आहे.
हा उन्नत मार्ग एकूण २१ किमी लांबीचा आहे. त्यातील १६ किलोमीटरचा मार्ग समुद्रात आहे. विविध प्रकारचे समुद्री वातावरण व लाटांना सामोरे जात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या मार्गाची प्रत्यक्ष उभारणी तीन टप्प्यांत पूर्ण केली आहे. चौथ्या टप्प्यात पथदिवे, अत्याधुनिक पथकर नाके, कॅमेरे बसविणे आदी कामांचा समावेश आहे. या टप्प्यालाच विलंब झाला आहे.
विलंबास कारण की…
प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात एकूण एक हजार २१२ पथदिवे बसविणे, सहा ठिकाणी पथकारांची उभारणी, कॅमेरे यांचा समावेश आहे. या कामांसाठीची निविदा ‘एमएमआरडीए’ने एप्रिल २०२३मध्ये काढून ही कामे ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे ठरवले होते. परंतु, जूनमध्ये प्राधिकरणामध्ये खांदेपालट झाल्यानंतर पुन्हा नव्याने निविदा काढण्यात आली. त्यातच विलंब झाला. नवीन कंत्राटदाराने मार्च २०२४पर्यंत ही कामे पूर्ण होतील, असे सांगितले. ‘एमएमआरडीए’ने कसोशीने ही कामे डिसेंबरमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सद्य:स्थितीत १५ फेब्रुवारीपर्यंत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता धुसर दिसत आहे.
प्रकल्पाची सद्य:स्थिती
बांधकाम पूर्ण : ९५ टक्के
पथदिवे उभारणी : १,२१२ पैकी १,१०४
पथकर स्थिती : गव्हाण येथील मुख्य पथकर कामे पूर्ण. शिवाजीनगर (अंतर्बदल) येथे लहान पथकर नाका अपूर्ण
मार्ग बदल : शिवाजीनगर व शिवडी येथील रॅम्प पूर्ण
बांधकाम खर्च स्थिती : १७,८४३ कोटींपैकी ९५ टक्के खर्च
(स्रोत : एमएमआरडीए)
Read Latest Maharashtra News And Marathi News