महाराष्ट्रात सुरू झाली पार्थिव गणेश पूजा
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांच्या काळात समाजातील एकी वाढण्याकरिता या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. महाराष्ट्रासोबतच भारतातही या गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो.
गणेश चतुर्थी व्रत कथा
शिवपुराणातील कथेनुसार, एकदा पार्वती मातेने अंघोळीपूर्वी शरीरावर हळद आणि उटणं लावलं होतं. अंगावरील हळद आणि उटणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले, अशाप्रकारे श्रीगणेशाचा जन्म झाला. माता पार्वतीने अंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्रीगणेशाला बसण्याची आज्ञा केली. यावेळी भगवान शंकर आले. पण गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही. यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शीर धडापासून वेगळं केलं. जेव्हा माता पार्वती तिथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दु:ख झालं. मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला, आपल्या मुलाचे शीर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. यावेळी सर्व देवताही तेथे जमा झाले. भगवान शंकर आणि भगवान विष्णूंनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शीर आणण्याचा आदेश दिला. बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचं शीर कापून आणलं. यानंतर शंकराने ते शीर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले. पण, यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती. कारण, गणपतीचं शरीर मानवी आणि शीर हत्तीचं होतं. यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं. याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी श्रीगणेशाची पूजा केली जाते. तसेच हत्तीच्या शीरामुळेच श्रगणेशाला गजमुख हे नाव पडलं.
गणेश पूजनात धार्मिक महात्म्य तर आहेच परंतु निसर्गचक्र सुरळीत ठेवण्यासाठी आपला हातभार लागावा हे ही या उत्सवाचे कारण आहे. वर्षा ऋतूत म्हणजेच आषाढ आणि श्रावण मासात बऱ्यापैकी पाऊस पडून गेलेला असतो. नद्या, ओढे, विहिरी, सरोवरे यांमध्ये जलसाठा मुबलक असतो परंतु शुद्ध नसतो. तो शुद्ध होण्याकरिता औषाधियुक्त एकवीस पत्री त्या जलाशयात सोडल्याने पाणीही औषधियुक्त होऊन त्याचा फायदा सर्व प्राणिमात्रांच्या आरोग्यास होतो. आणि शेंदूर म्हणजे शुद्ध गंधक हा धातू याचे संयोगाने सूक्ष्म विषाणू नष्ट होतात, परिणामी अशुद्ध पाण्याच्या संसर्गाने होणाऱ्या रोगास प्रतिबंध मिळू शकतो. परंतू हल्ली उंचच उंच मूर्ती आणणे, जलप्रदूषण होईल अशा मूर्ती विसर्जीत करणे हेच आपण पाहतो आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे. जे की आपण सर्व मिळूनच थांबवू शकतो.