तळोजातील वेगवेगळ्या कंपन्यांमधून रात्री, पहाटे दूषित वायू सोडला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. वारंवार निदर्शनास आणूनही सरकारच्या अक्षम्य होणाऱ्या दुर्लक्षामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील संबंधित रासायनिक कारखान्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधीत केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून या लक्षेवधीवर उत्तर देण्यात आले. वायू आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक यंत्रणा उद्योगांनी बसवले आहे की नाही, याची तपासणी नियमितपणे केली जाते. यंत्रणा नसल्यास किंवा बंद असल्यास कायदेशीर कारवाई केली जाते. तक्रारी आल्यास रात्रीच्या वेळी गस्त घालून उद्योगांची तपासणी करून दोषी आढळल्यास कारवाई केली जाते. सप्टेंबर ते डिसेंबर २०२३मध्ये सतत वातावरणीय हवा गुणवत्ता तपासणी केंद्र तोंडरे तळोजा व कळंबोली अहवालावरून हवेची गुणवत्ता खराब व अती खराब श्रेणीमध्ये आढळून आली नसल्याचे एमपीसीबीचे म्हणणे आहे. हिवाळ्यात रात्रीच्या वेळी तापमानात होणारी घट यामुळे उत्सर्जित वायूंचे विसर्जन होण्यास अडथळा निर्माण होत असल्याने नजीकच्या परिसरात रासायनिक वास पहाटेच्या वेळी जाणवल्याचे कारण एमपीसीबीने दिले आहे.
विशेष तपास पथक, देखरेख समिती
तळोजातील सामाजिक कार्यकर्ते राजीव सिन्हा यांनी लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर विशेष तपास पथकाची स्थापना केली. या विशेष तपास पथकाने परिसरात हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली. लोकायुक्तांच्या आदेशाने प्रदूषणाबाबत प्रगती आढावा अहवाल तपासण्यासाठी देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी, एमआयडीसी, पनवेल महापालिका, सिडको, पोलिस निरीक्षक तळोजा एमआयडीसी व उद्योजकांची समिती नेमली आहे.
प्रदूषणामुळे कोणाचाही मृत्यू नाही
लोकायुक्तांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पनवेल महापालिका उपजिल्हा रुग्णालयाकडून रहिवाशांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामाबाबतचा अहवाल मागविला होता. या अहवालात तळोजा औद्योगिक वसाहतीतून निर्माण होणाऱ्या वायू व जल प्रदूषणामुळे सभोवतालच्या परिसरातील लहान मुले प्रदूषणामुळे मृत होणे, लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होणे या बाबतची नोंद रुग्णालयातील अहवालानुसार अशा घटना घडल्या नसल्याचे म्हटले आहे.