महाड आणि माणगाव पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना बाजूला केले. मात्र तरीही पोलिसांसमोरच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. हा प्रकार शुक्रवारी महाड शहर परिसरात घडला. महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जिल्हा राखीव पोलीस दलाबरोबरच महाड औद्योगिक पोलीस ठाणे महाड शहर महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात केले. पोलिसांसमोरही जोरदार घोषणाबाजी आणि एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार घडल्याने सार्वजनिक शांतता बिघडण्याचा प्रयत्न झाला.
महाड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यावरून वाद निर्माण झाल्याने अखेर पोलिसांनी पुतळा परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करून एका पोलीस कर्मचारी महिलेने हार घातला. महाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे आणि माणगाव उपविभागीय पोलीस स्वामी हेही पोलीस कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात ही सगळी परिस्थिती शांत करण्यात पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं. दरम्यान महाड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारपासूनच मोठ्या प्रमाणावर शिंदे गटाकडून गर्दी जमा झाली होती. तर उद्धव ठाकरे गटाकडून त्या पक्षाचे कार्यकर्ते माणिकराव जगताप यांच्या कार्यालयात जमा झाले होते.
अखेर पाचच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते माणिकराव जगताप यांच्या कार्यालयाजवळून चालत घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वाद निर्माण झाला. दरम्यान महाडमध्ये शांतता असून महाड शहर परिसर आणि तालुक्यात शांततेचे वातावरण आहे. या सगळ्या पोलीस प्रशासनही लक्ष ठेऊन आहे, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांनी दिली.