छगन भुजबळ यांच्या या पवित्र्याने थोडावेळ पत्रकारही संभ्रमात पडले होते. पण छगन भुजबळ यांनी शेवटपर्यंत मनोज जरांगे आणि त्यांच्या मागण्यांविषयी उपरोधिक टीका करणे सुरु ठेवले. भुजबळांच्या या पत्रकार परिषदेची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण सगळ्यांनाच आरक्षण दिले पाहिजे. एवढेच कशाला मनोज जरांगे यांच्यासोबत काम करणाऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. नाहीतर ते मोर्चा घेऊन येतील. राज्य सरकारने त्यांना घाबरुन वाटाघाटीत वेळ न घालवता तात्काळ मनोज जरांगे सांगतील तसा जीआर काढला पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
देव जरी आडवा आला तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार: जरांगे पाटील
जरांगे पाटील यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. मराठा समाजाला आरक्षण मिळणे अवघड नाही. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी या आढळल्या आहेत.मराठा समाज ओबीसी आरक्षणात जाणार शंभर टक्के जाणार देव जरी आडवा आला तरी तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मर्यादेचा विषय आहे तर तुम्हाला मर्यादा जर वाढवायच्या असतील तर अगोदर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा आणि त्यानंतर आपल्याला जेवढी आरक्षणाची मर्यादा वाढवायची आहे तेवढी वाढवावी, असे त्यांनी म्हटले.
आम्ही जेव्हा उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस सरकारचेच मंत्री आणि अधिकारी आमच्याशी बातचीत करण्यास आले होते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने जे काही लिहून घेतले आहे त्याचीच पूर्तता करावी आत्ताही काल ते तो कागद घेऊन आले होते आणि आम्ही तोच कागद त्यांना उघडायला लावला आणि वाचायला लावला आणि त्याचीच पूर्तता करावी, अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. त्यामुळे सरकारने आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटलांचा सर्वपक्षीय मराठा आमदारांना इशारा
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाज पेटला आहे. मराठा युवक सध्या काहीही काम करत नाही त्याच्या हाताला काम नाही त्यामुळे त्याला आरक्षणाची गरज आहे. आता सर्व पक्षातील मराठा आमदारांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावेत. या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहावे. अन्यथा येणाऱ्या काळात मते मागण्यासाठी आपण आमच्या दाराला येणार आहात, याचा विचार करावा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.