घाऊक बाजारात तूरडाळीसह इतर डाळींचे दर २० रुपयांपर्यंत घटले आहेत. १५ किलोंचा खाद्यतेलाचा डबाही ४० ते २०० रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे. दिवाळीत मागणी वाढल्याने डाळींच्या दरांनी शंभरी गाठली होती. खाद्यतेलांचे दरही तेव्हा वाढले होते. मात्र, आता मागणी घटल्याने डाळी आणि खाद्यतेल स्वस्त होण्यास सुरुवात झाली आहे. किराणा दुकानांत तूरडाळ किलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी स्वस्त झाली आहे. चणाडाळ प्रतिकिलो चार ते पाच, उडीद डाळ तीन ते चार रुपये, तर मसूर डाळ सात ते आठ रुपयांनी घसरली आहे. याबरोबरच सूर्यफूल तेलाचा १५ लिटरचा आणि सोयाबीन तेलाचा १५ किलोंचा डबा ४० रुपयांनी स्वस्त झाला आहे. गेल्या वर्षभरापासून किराणा बाजारात शेंगदाणा तेलाच्या दराने उच्चांक गाठला होता. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून आता शेंगदाणा तेलाच्याही दरात घसरण होत आहे. घाऊक बाजारात शेंगदाणा तेलाचा १५ किलोंचा डबा दीडशे ते दोनशे रुपयांनी स्वस्त झाला आहे.
खोबरे एकाएकी कडाडले
किराणा बाजारात नवीन तांदळाची आवक सुरू झाली आहे. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक काही प्रमाणात कमी असल्याने तांदूळ यंदाही महाग असल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा घाऊक विक्रेत्यांकडे तांदूळ प्रतिकिलोमागे तीस रुपयांपर्यंत वधारला आहे. त्याचबरोबर किराणा बाजारात खोबरेही एकाएकी महाग झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. बुधवारी (दि. २०) घाऊक बाजारात १२५ रुपये किलोंप्रमाणे विक्री होणारे खोबरे गुरुवारी दहा रुपयांनी वाढून १३५ रुपये किलोंवर पोहोचले होते.
…असे जिन्नस, असे दर
खाद्यतेल जुने दर नवे दर (१५ किलो)
सूर्यफूल १६४० १६००
सोयाबीन १६५० १६१०
शेंगदाणा ३१०० २९००
डाळी जुने दर नवे दर (प्रतिकिलो)
तूरडाळ १८० १६० ते १६५
चणाडाळ ८८ ८०
उडीद डाळ १३४ – १३५ १३०
मसूर डाळ ९६ ९०
००–००
तांदूळ जुने दर नवे दर (प्रतिकिलो)
बासमती १४० ते १४५ १७०
इंद्रायणी ४८ ५७
कोलम ५२ ते ५३ ६०
दिवाळीनंतर ग्राहक घटल्याने खाद्यतेल आणि डाळींचे दर काही प्रमाणात घसरले आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाचे पीक कमी आले असून, मोठ्या प्रमाणावर कच्चा माल कर्नाटकला पाठविला जात आहे. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभापासूनच तांदूळ महागला आहे. तांदळाची दरवाढ वर्षभर कायम राहू शकेल.-प्रवीण संचेती, व्यावसायिक