वाचा: वेळेवर पगार नाही… एसटी महामंडळाला जबाबदार धरत कर्मचाऱ्याची आत्महत्या
शेडगाव जवळच्या मावळेवस्ती येथील हरी नामदेव कोकरे (वय १५) व वीरेंद्र रामा हाके (वय १६) हे दोघे शुक्रवारी दुपारी शेळ्या चारण्यासाठी शेतात घेऊन गेले होते. सध्या शाळा बंद असल्याने मुले शेळ्या सांभाळण्याचे काम करीत आहेत. शेळ्या घेऊन शेतात जायचे, आणि सायंकाळी परत यायचे अशा दिनक्रम ठरलेला आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी शेळ्या घेऊन गेल्यानंतर सायंकाळी ही मुले घरी परत आलीच नाहीत. फक्त शेळ्याच घराच्या ओढीने धावत घरी आल्या. त्यामुळे मुले कुठे गेली. याची शोधाशोध सुरू झाली. गावात आणि जेथे शेळ्या चारायला घेऊन जातात तेथे पाहणी केली. गावातील मंदिराच्या जवळ एका शेतकऱ्याचे शेततळे आहे. तेथेही काही जण शोध घेत गेले. अंधार पडत आला होता. शेततळ्याजवळ मुलांचे कपडे व चपला दिसल्या. त्यामुळे मुले येथे आली असावीत, याचा अंदाज आल्याने तळ्यात पाहायला सुरुवात केली. तर पाण्यावर एका मुलाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. दुसरा मुलगा दिसत नव्हता. गावकरी जमले. पोलिसांनाही कळविण्यात आले. अंधार पडल्याने शोध कार्यात अडथळा येत होता. पेडगाव येथील आसिफ शेख व समीर शेख या तरुणांनी पाण्यात उडी घेऊन दुसरा मृतदेहही पाण्यातून बाहेर काढवा.
वाचा:‘आम्हाला राणेंची काळजी वाटते, त्यांच्या मुलांनी त्यांना त्रास देऊ नये’
ही मुले शेळ्या चारण्यासाठी गेली, त्यावेळी दुपारीच पोहण्यासाठी शेततळ्यात गेली असावीत. मात्र, निसरडा कातळ आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकल्याने ती तळ्यात पडून बुडाली असावीत. या परिसरात माणसांचा फारसा वावर नसल्याने आणि त्यांच्यासोबत तिसरे कोणी नसल्याने ही घटना त्यावेळी लक्षात आली नसावी. जेव्हा शेळ्या एकट्याच घरी गेल्या, तेव्हा कुटुंबीयांनी शोधाशोध केल्यानंतर ही घटना उघडकीस आली, दोघांच्या मृत्यूमुळं हळहळ व्यक्त होत आहे. मुले राहतात ती मावळेवस्ती कर्जत तालुक्यात येते, तर शेततळे असलेले शेत श्रीगोंदा तालुक्यात येते.
वाचा: नाशिकमध्ये भाजपला धक्का; माजी उपमहापौर शिवसेनेच्या वाटेवर