विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागातर्फे सध्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यासोबतच नगर आणि नाशिकमध्येही परीक्षा होत आहेत. वेळापत्रकानुसार, शुक्रवारी एमबीए प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रातील ‘लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस’ या विषयाची परीक्षा होती. चिखली येथील डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये परीक्षा केंद्र आहे. या परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्यापूर्वी सकाळीच प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यात आली. त्यानंतर ही प्रश्नपत्रिका पुढील काही मिनिटांतच सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर व्हायरल झाली.
ही माहिती परीक्षा आणि मूल्यमापन विभागाला मिळाल्यानंतर, संबधित विषयाची परीक्षा रद्द करण्यात आली. नव्या निर्णयानुसार ही परीक्षा २६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘विद्यापीठाला पेपरफुटी तातडीने समजते’
विद्यापीठाच्या परीक्षा आणि विभागाने पेपरफुटी रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. त्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून, संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हायरल करून, ती फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याची माहिती तातडीने परीक्षा आणि मूल्यमापन विभागाला मिळते. ‘लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस’ची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यावर, त्याची माहिती तातडीने विभागाला समजली. ही प्रश्नपत्रिका सर्वप्रथम डाउनलोड करण्यात आलेल्या कम्प्युटरचा ‘आयपी ॲड्रेस’ही शोधण्यात आला आहे. त्यामुळे ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षेत एमबीए प्रथम वर्षाच्या ‘लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस’ची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने ही प्रश्नपत्रिका रद्द केली. चिखली येथील डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून ही प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती आहे. या प्रकाराची चौकशी केल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. प्रश्नपत्रिका व्हायरल करण्याचा कोणीही प्रयत्न करू नका; अन्यथा फौजदारी कारवाईने शैक्षणिक वर्षाचे नुकसान होईल.- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ