मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मरीन ड्राइव्ह ते कांदिवली या सुमारे ३५ किमी अंतरात सागरी किनारा मार्ग प्रकल्पाची आखणी केली आहे. मरीन ड्राइव्ह ते वरळी प्रकल्पाचा सुमारे ९.५. किमीचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या दिशेने असून वांद्रे ते वर्सोवा प्रकल्पाचे काम एमएसआरडीसी करत आहे. पालिका वर्सोवा ते दहिसर या टप्प्याचे काम करणार आहे. पश्चिम उपनगरातील वर्सोवा हे मुंबईच्या उत्तर टोकावरील समुद्रकिनाऱ्यावरील गाव असून ते मुंबईचे शेवटचे टोक असलेल्या दहिसरशी जोडले जाणार आहे. या कामासाठी ऑगस्टमध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या.
शुक्रवारी या निविदांचे सी पाकिट उघडण्यात आले. एकूण सहा पॅकेजमध्ये हे काम चालणार असून त्यासाठी चार बड्या कंत्राटदारांची निवड झाली आहे. या चारही कंपन्या सध्या मुंबईत बांधकामे सुरू असलेल्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सहभागी आहेत. एल ॲण्ड टी सागरी किनारा मार्गाच्या मरीन ड्राइव्ह-वरळी प्रकल्पात काम करत आहे. तर मेघा इंजिनीअरिंग आणि एनसीसी लिमिटेड यांना मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम देण्यात आले आहे. तसेच गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाशी संबंधित कामे जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्सना देण्यात आली आहेत.
काम आणि कंत्राटदार
पॅकेज ए : वर्सोवा ते बांगूरनगर, गोरेगाव ४.५ किमी
ॲप्को इन्फ्राटेक्ट प्रा. लि.
पॅकेज बी : बांगूरनगर ते माइंडस्पेस, मालाड
१.६६ किमी
जे. कुमार आणि एनसीसी लिमिटेड (संयुक्त)
पॅकेज सी आणि डी : उत्तर आणि दक्षिणेकडे जाणारा सर्व्हिस रोड, मालाड माइंडस्पेस ते चारकोप कांदिवली ३.६६ किमी
मेघा इंजिनीअरिंग
पॅकेज ई : चारकोप ते गोराई
३.७८ किमी
लार्सन अँड टुब्रो
पॅकेज एफ : गोराई ते दहिसर ३.६९ किमी
ॲप्को इन्फ्राटेक्ट प्रा. लि.
मुंबईच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेले वर्सोवा-दहीसर हे दुसऱ्या टप्प्यातील काम नवीन वर्षात सुरू होईल. हा मार्ग गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडला जाणार असल्याने पूर्व-पश्चिम उपनगरे जवळ येतील. तसेच मुंबईच्या आर्थिक प्रगतीत या प्रकल्पाचे मोठे योगदान असेल.- पी. वेलरासू , अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प)