नेमकं काय घडलं?
दिंडोरी रस्त्यावरील पुणे विद्यार्थी गृहाच्या महाविद्यालयात विविध शासकीय यंत्रणांच्या पदभरतीसाठी ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा केंद्रात दुपारी तीन ते सहा या सत्रावेळी पार्किंगमधील वाहनांच्या डिकीतून चोरी झाल्याचा प्रकार घडला. अहमदनगर येथील २९ वर्षीय विशाल वसंत गिते यांनी याबाबत म्हसरूळ पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या बॅगेतील दोन मोबाइल, दोन घड्याळे व चांदीचे दागिने लंपास झाले. २३ हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याने पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. म्हसरूळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजू पाचोरकर, सहायक पोलिस निरीक्षक विनायक अहिरे, सुधीर पाटील आणि पोलिस अंमलदार देवराम चव्हाण यांनी परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी संशयित त्यात दिसून आला. संशयितासंदर्भातील माहिती स्थानिक गुन्हे शोध पथकाला देण्यात आली. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास परीक्षा केंद्राबाहेरील एका झाडाखाली संशयित चारोस्कर उभा असल्याचे पोलिसांना समजले. ताब्यात घेतल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. ‘एम. ए.’ पर्यंत शिक्षण झाले असले, तरी जेमतेम पैशांसाठी त्याने चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी अंमलदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
मोबाइल हिसकावले
गंगाघाट परिसरातील संत गाडगे महाराज पुलाजवळील भाजी बाजारात गर्दीचा गैरफायदा घेत एका वृद्ध व्यक्तिसह महिलीजवळील मोबाइल हिसकावण्यात आले. याबाबत शिरीष पंढरीनाथ भालेराव (वय ७८) व लीला विजय गौंड (५८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंचवटी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हे नोंदवला आहे.
वाहनांची चोरी
शरणपूर रस्त्यावरील अनुरती अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकीची (क्र. एमएच १५, एचई ४१२२) चोरी झाली. महात्मानगर परिसरातील समर्थनगर बस थांब्याजवळील दुकानाबाहेरूनही एमएच १५, एफएल ३०२५ क्रमांकाची दुचाकी चोरी गेली. याबाबत वाहन चालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा व गंगापूर पोलिसांत अज्ञातांविरूद्ध वाहन चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.