‘केंद्रात सहकारमंत्री कोण आहे हे माहीत आहे ना?’; राज्यातील भाजप नेत्याचा इशारा

हायलाइट्स:

  • भाजप नेत्याचा राज्यातील सहकार सम्राटांना इशारा
  • साखर कारखान्यांच्या एफआरपीबाबतच्या भूमिकेवर दिली प्रतिक्रिया
  • बांबू लागवड चळवळीला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचीही ग्वाही

सोलापूर : काही महिन्यांपूर्वी देशात सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली आणि या खात्याचा कारभार गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे सोपवण्यात आला. सहकार खात्याच्या माध्यमातून राज्यातील सहकार सम्राटांवर वचक ठेवला जाईल, अशी चर्चाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच आता भाजप नेते आणि कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी कारखानदारांना इशारा दिला आहे.

‘देशात आता कोण सहकार मंत्री आहे हे माहीत आहे ना?’ असा सवाल करत पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून कारखानदारांवर निशाणा साधला. ते आज सोलापुरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंदिरे १० दिवसांत उघडा, अन्यथा…; अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला इशारा

अनेक कारखान्यांमध्ये उसाला एफआरपी दिली जात नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना विनंती करणार का, असा प्रश्न पाशा पटेल यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना पटेल यांनी राज्यातील कारखानदारांना इशारा दिला आहे.

दरम्यान, शेतीमालाच्या पडलेल्या भावाच्या प्रश्नावर बोलताना पटेल म्हणाले की, केंद्राने चालू वर्षी उसाची एफआरपी ५० रुपयांनी वाढवली आहे. तर राज्यात अतिरिक्त उत्पादित झालेला शेतीमाल राज्य सरकारने सरकारी हमीभावाने विकत घ्यावा, त्यातील अर्धी रक्कम केंद्राने द्यायचा निर्णय शुक्रवारीच झाला आहे, अशी माहिती पाशा पटेल यांनी दिली आहे.

दरम्यान, यावेळी पटेल यांनी आपण बांबू लागवड चळवळीला चालना देण्यासाठी प्रयत्न करत असून यासाठी राज्यभर फिरून शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे महत्व पटवून सांगणार असल्याचं सांगितलं. या पत्रकार परिषदेत राज्याचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, कोनबॅक संजीव करपे हे देखील उपस्थित होते.

Source link

amit shahpasha patelsolapur newsअमित शहापाशा पटेलसहकार मंत्रीसोलापूर न्यूज
Comments (0)
Add Comment