मुळचा हरियाणाचा असलेला अमित याला दारुचे व्यसन असल्याने पत्नी भावना त्याला सोडून कासारवडवली गावात वास्तव्यास असलेल्या दिर विकास याच्यासोबत मुलांसह राहत होती. अमित हा पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी तसेच १३ डिसेंबरला मुलाचा वाढदिवस असल्याने आला होता. शिवाय तो त्यांच्यासोबतच राहत होता. २१ डिसेंबर रोजी सकाळी विकास नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर अमित याने सुरुवातीला क्रिकेटच्या लाकडी बॅटने डोक्यात प्रहार करुन पत्नीची हत्या केली. नंतर दोन लहान मुलांनाही संपवले. आणि तो फरार झाला होता.
आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची आठ पथके स्थापन करुन ही पथके वेगवेगळया ठिकाणी पाठवण्यात आली. तांत्रिक तपासामध्ये आरोपी हरियाणाला पळुन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ वागळे युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश महाजन, पोलिस उपनिरीक्षक तुषार माने यांची दोन पथके हरियाणाला पाठवली. या पथकांनी अमित याला हिसार रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
अमित आणि भावना यांचा आठ वर्षापूर्वी विवाह झाला होता. तिन वर्ष एकत्रित राहिले होते. मात्र, पत्नी दुरावल्याचा राग आरोपीच्या डोक्यात होता. पुन्हा एकत्र येण्याबाबत त्याने प्रयत्नही केले होते. मात्र, हे प्रयत्न यशस्वी झाले नाही. २१ डिसेंबरला त्यांच्यात भांडण झाले. नंतर आरोपीने तिघांची हत्या केल्याची माहिती पाटील यांनी दिली.