मिळालेल्या माहितीनुसार, अहिरे (ता. खंडाळा) येथील शेरी नावाच्या शिवारात मोहन धायगुडे आणि संशयित ज्ञानेश्वर उर्फ नोन्या धायगुडे यांची शेती आहे. या दोघांमध्ये शेताच्या बांधावरून नेहमी वाद होत होते. शनिवार, दि. २३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर उर्फ नोन्या धायगुडे याने शेतीचा बांधा कोरण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान, मोहन धायगुडे यांच्याशी त्याचा वाद झाला होता. यावेळी संशयित आरोपी नोन्या याने मोहन यास शिवीगाळ करून तुला जिवंत ठेवत नसतो, अशी धमकी दिली होती. दरम्यान, या घरगुती वादाच्या घटनेची कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात केली नव्हती.
यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर उर्फ नोन्या धायगुडे आणि मोहन यांची गावाच्या पारावर भांडण झाली. या भांडणात ज्ञानेश्वर उर्फ नोन्या याने मोहन याच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर ज्ञानेश्वर उर्फ नोन्याने धायगुडे याने मोहन यास स्वत:च्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी खंडाळा बाजूकडे घेऊन गेला. या घटनेची माहिती खंडाळा पोलिसांना मिळताच त्यांनी ज्ञानेश्वर उर्फ नोन्या याला रस्त्यामध्ये ताब्यात घेतले. या घटनेची फिर्याद वैशाली मोहन धायगुडे यांनी दिली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.
सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी अहिरे येथील लहान मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून त्या मुलीचा मृतदेह निरा नदीपात्रात फेकून दिला होता. घटनेतील मुख्य संशयित आरोपी ज्ञानेश्वर उर्फ नोन्या हा होता. ही घटना उघड झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. तर या घटनेचा तपास करणे पोलिसांना आव्हानात्मक बनले होते. घटना घडल्यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून नोन्याला ताब्यात घेतले होते. परंतु, सबळ पुराव्याअभावी नोन्याची न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली होती.