या महामार्गांवर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे या महामार्गांना समांतर असे उन्नत मार्ग बांधण्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच केली होती. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील या दोन्ही महामार्गांच्या उन्नत मार्गांच्या बांधकामासाठीच्या निविदा एनएचएआयने प्रकाशित केल्या आहेत. पुणे-शिरूर मार्गासाठी साडेसात हजार कोटी रुपये, तर नाशिक फाटा-खेड मार्गासाठी सहा हजार तीनशे कोटी रुपये खर्च होणार आहेत.
पुणे-शिरूर महामार्ग
पुणे ते शिरूर महामार्गाचे काम तीन टप्प्यांत केले जाणार आहे. शहराच्या हद्दीपासूनच शिरूरपर्यंतचा हा मार्ग जमिनीलगत सहा पदरी आणि त्यावर उन्नत स्वरूपात सहा पदरी अशा स्वरूपाचा बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नाशिक फाटा-खेड महामार्ग
नाशिक फाटा ते खेड महामार्ग काही टप्प्यांत चार पदरी असल्याने तो आवश्यकतेनुसार सहा पदरी करून त्या लगत दोन्ही बाजूला सेवा रस्ते तयार केले जाणार आहेत. तर, नाशिक फाट्यापासून ते खेडपर्यंत संपूर्ण आठ पदरी उन्नत महामार्ग बांधण्यात येणार आहे.
चाकणपर्यंत मेट्रोची शक्यता धूसर
पुणे ते शिरूर दरम्यान उन्नत मार्गाचे बांधकाम करताना सुरुवातीच्या टप्प्यात सध्याच्या अस्तित्वातील मेट्रोच्या विस्ताराच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तर, नाशिक फाटा ते चाकण दरम्यानच्या प्रस्तावित मेट्रो विस्ताराबाबत मात्र कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे आठ पदरी उन्नत महामार्गच होणार असल्याने चाकणपर्यंत मेट्रो होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.
रुंदीकरणाचीही योजना
या दोन महामार्गांप्रमाणेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्याची रुंदी वाढविण्यात येणार असून, त्याशिवाय या रस्त्यावरही चार पदरी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. या ५५ किमीच्या मार्गासाठी जवळपास पाच हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.