आता डबलडेकरमध्ये कॅफेटेरिया अन् लायब्ररी; पालिकेकडून निविदा जारी, जंक्शनचीही निवड झाली

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया आणि लायब्ररी असे खास आकर्षण आता बेस्टच्या नॉन एसी डबलडेकर बसमध्ये मुंबईकरांना मिळणार आहे. दक्षिण मुंबईतील तीन जंक्शनच्या ठिकाणी या बस उभ्या केल्या जाणार आहे. ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुंबई पालिकेच्या बी वॉर्डकडून निविदा काढण्यात आली आहे. फेब्रुवारीपासून प्रवाशांना या सुविधेचा आनंद लुटता येईल, अशी माहिती मुंबई पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बेस्टची पहिली डबलडेकर बस ८ डिसेंबर १९३७ ला प्रवाशांसाठी चालवण्यात आली होती. एका बसची कालमर्यादा १५ वर्षे असते. त्यानुसार डबलडेकर बस कालबाह्य करण्यात आल्या. त्यानंतर बेस्टच्या ताफ्यातील शेवटची बस १५ सप्टेंबरला धावली. या कालबाह्य डबलडेकर बसचा वापर मुंबई महापालिकेने विविध सुविधा देण्यासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही यात रुची दाखवून ही सुविधा मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या बी वॉर्डकडून तीन नॉन एसी डबलडेकर बसमध्ये कॅफेटेरिया, आर्ट गॅलरी आणि लायब्ररी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी आर्किटेक्चरकडून बसचे रेखाचित्रही पालिकेला सादर केले आहे. एका डबलडेकर बसमध्ये कॅफेटेरिया, दुसऱ्या बसमध्ये लायब्ररी आणि तिसऱ्या बसमध्ये आर्ट गॅलरी असणार आहे. बेस्टकडून या २३भंगारात काढण्यात आल्या असून त्यामध्ये बदल करून या सुविधा दिल्या जाणार असल्याचे सांगितले. या कामासाठी पालिकेच्या बी वॉर्डकडून २३ डिसेंबरला निविदा काढण्यात आली आहे. तर ३१ डिसेंबर ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे.

तीन रस्त्यांची निवड

डबल डेकरमधील या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळावा, यासाठी दक्षिण मुंबईतील तीन जंक्शनची ठिकाणे निवडण्यात आली आहेत. यामध्ये वाय. एम. रोड, क्रॉफर्ड मार्केट आणि शालिमार जंक्शनचा समावेश आहे. कॅफेटेरियामध्ये विविध खाद्यपदार्थांची मेजवानीच खवय्यांना मिळणार आहे. यातून विविध संस्कृतीचे दर्शनही घडवले जाईल. लायब्ररीतही मराठी, हिंदी, इंग्रजीतील विविध पुस्तके वाचकांना मिळू शकणार आहेत.

जे. जे. उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण

मुंबई पालिकेच्या ए, बी आणि ई वॉर्डातून जाणाऱ्या जे. जे. उड्डाणपुलाखाली सुशोभीकरणही केले जाणार आहे. या पट्ट्यातच बस ठेवण्यात येणार असल्याने उड्डाणपुलाखालीही सुशोभीकरण केले जाईल, अशी माहिती देण्यात आली. विविध प्रकारची झाडे, रंगीबेरंगी छायाचित्र, रोषणाई आदी या सुशोभिकरण करण्यात येईल.

तुम्ही तयारीला लागा, मुंबईत आमरण उपोषण करणार ; जरांगेंनी नव्या लढाईला हाक दिली

Source link

best busbest doubledecor busBMCmumbai municiple corporationmumbai newsबेस्ट डबलडेकर बसमुंबई न्यूजमुंबई महापालिका
Comments (0)
Add Comment