याबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवारी, दि. २० डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पर्यंती (ता. माण, जि. सातारा) गावच्या हद्दीत राहणाऱ्या नंदाबाई भिकू आटपाडकर (५८), संपताबाई लक्ष्मण नरळे (७५) यांचा अज्ञात व्यक्तींनी अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम चोरी करण्यासाठी दोघींचा गळा आवळून खून केला होता. याबाबतची फिर्याद म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते यांनी घटनास्थळी भेट दिली होती.
त्यावेळी समीर शेख, आँचल दलाल यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते यांच्या अधिपत्याखाली तपास पथके तयार करून पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. पर्यंती (ता. माण, जि. सातारा) हे गाव सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. ते दुर्गम ठिकाणी म्हसवड शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे.
या गावात जाण्यासाठी कच्चा रस्ता असून आजूबाजूच्या गावात लोकवस्ती विरळ आहे. तपास पथकाने गुन्हा घडल्यापासून घटनास्थळ आणि आजूबाजूच्या साक्षीदारांकडे विचारपूस करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकाराबाबत काहाही माहिती मिळाली नाही. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय माहितीनुसार दोन व्यक्तींची माहिती मिळाली. त्या दोन्हीही व्यक्ती परराज्यातील असून सध्या पर्यंती गावात राहात असल्याचे समजले. त्यातील जेसीबी चालकाने त्याचा साथीदाराच्या मदतीने सोन्याचे दागिने व पैशाच्या हव्यासापोटी दोन महिलांचा खून केल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तपास पथकांना त्या दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.
तपास पथकांनी पर्यंती गावचा परिसरात आणि आजूबाजूच्या परिसरात मिळालेल्या माहितीनुसार त्या दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. संदीप शेषमनी पटेल (३०) आणि अजितकुमार रामकिशोर पटेल (२९) दोघेही रा. परसिधी, कारोल खुर्द, सिधी सिहवाल राज्य मध्य प्रदेश अशी त्यांची नावे आहेत. तपास पथकाने या दोघांकडे विचारपूस केली असता त्यांनी सोन्याचे दागिने आणि पैसे मिळवण्यासाठी दोन्ही वृद्ध महिलांचा खून केला असल्याची कबुली दिल्याने या दुहेरी खुनाचा गुन्हा ७२ तासाच्या आत उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे.