पवार यांनी शनिवारी सकाळी साडेसहा वाजता भिडे वाड्याच्या जागेची पाहणी केली. महापालिका प्रशासनाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार भिडेवाड्याचा कायदेशीर ताबा घेऊन, तेथील बांधकाम पाडले होते. त्या जागेची पाहणी पवार यांनी केली. त्यानंतर त्यांनी समताभूमी येथील महात्मा फुले वाड्याला भेट दिली. या वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पुणे महपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रित करून भव्य स्मारक उभारावे, असा आमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी पावणेचार एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे स्मारक उभारणे शक्य आहे. या ठिकाणी फिरताना स्थानिकांनाही या दोन्हीही जागा एकमेकांना जोडल्या जाणार असल्याची कल्पना आहे. त्यास कोणाचा विरोध नाही. मात्र, स्थानिकांसाठी पर्यायी रस्त्याचे नियोजन करावे लागणार आहे.’
नागरिकांची सहमती, पण…
या एकत्रित स्मारकासाठी अनेक कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार आहेत. यापूर्वी प्रशासनाने काही कुटुंबाचे स्थलांतर केले आहे. पाहणी करीत असताना अजित पवार यांना काही स्थानिक नागरिक भेटले. त्यांनी स्थलांतर करण्यास सहमती दर्शवली. मात्र, आमचे पुनर्वसन चांगले आणि जवळच्या परिसरातच व्हावे, आम्हाला वाऱ्यावर सोडू नये, अशी इच्छा नागरिकांनी व्यक्त केल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच, या ठिकाणी जागा मालक आणि भाडेकरू अशीही व्यवस्था आहे. त्यामुळे मालक आणि भाडेकरू या दोघांचेही समाधान करावे लागणार आहे. या दोघांचीही पर्यायी व्यवस्था करून हे दोन्ही भाग जोडण्याचा सरकारचा मनोदय आहे, असे पवार या वेळी म्हणाले.
भिडे वाड्याचीही पाहणी
‘भिडे वाडा येथे जागेची मर्यादा लक्षात घेऊन तज्ज्ञांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येईल. पुढच्या पिढीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य लक्षात रहावे आणि याठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू झाली हे कळावे, या पद्धतीने सर्व स्मारकाची रचना करण्याचा प्रयत्न आहे. बाहेरून पुरातन वास्तू दिसावी आणि आतील बाजूस विद्यार्थीनी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा असाव्यात, असा प्रयत्न राहील. वाहनतळासाठीही व्यवस्था करण्याबाबत परिसरातील जागेचा उपयोग करता येतो, का याबाबतही विचार सुरू आहे,’ असे पवार यांनी सांगितले.