लोकसभेतील गोंधळ प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह खासदार अमोल कोल्हे यांचेदेखील निलंबन करण्यात आले आहे. या विरोधात किल्ले शिवनेरी जुन्नर येथे मोर्चा काढण्यात येणार असून पुण्यात देखील सभा घेतली जाणार आहे. याबद्दल अजित पवार यांना विचारले असता, “खासदारांनी वेळीच मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं, यांना उमेदवारी मी दिली, निवडून आणण्यासाठी दिलीपराव वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं. आज आंदोलन वगैरे करतायेत हे ठीक आहे, मात्र मधल्या काळामध्ये हे मतदारसंघातील कोणत्याच विधानसभा क्षेत्रात फिरकलेच नाहीत. मध्यंतरी हेच माझ्याकडे येऊन राजीनामा देण्याची गोष्ट करत होते” असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.
मध्यंतरी यांनीच माझ्याकडे आणि वरिष्ठांकडे येऊन राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी एक कलावंत असून माझ्या कामावर आणि सिनेमावर परिणाम होत आहे. मी काढलेला शिवाजी महाराजांवरील एक सिनेमा अजिबात चालला नाही. माझ्या आर्थिक गोष्टींवर याचा परिणाम होत आहे असेही त्यांनी सांगितलं होतं. मी हे कधीही बोलणार नव्हतो. मात्र आता यांना निवडणुका जवळ आल्याने पदयात्रा संघर्ष यात्रा काढण्याचा उत्साह आल्याने हे बोलावं लागत आहे अशी टीका यावेळी अजित पवार यांनी कोल्हेंवर केली आहे.
दरम्यान उमेदवारी देण्यास तुम्ही चुकला का असा प्रश्न केला असता, त्यावेळी उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने दिली होती. परंतु तुम्हाला खासदारकी दिली असता तुम्ही विचार करायला हवा की, आपल्याला मतदारसंघामध्ये फिराव लागणार, संपर्क ठेवावा लागेल, लोकांची काम करावे लागतील. परंतु जर तुम्ही पहिल्या वर्ष दोन वर्षातच ढेपाळला आणि तिसऱ्या वर्षी म्हणायला लागले की मला राजीनामा द्यायचा तर आम्ही काय करणार, असा टोलाही यावेळी अजितदादांनी लगावला.
पुरेसा पाऊस राज्यात झाला नसल्याने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाणी प्रश्न संदर्भात बैठक घेण्यात आली होती, बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Read Latest Maharashtra News And Marathi News