ठाणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या रितेश पाटील हा तरुण सन २०२२मध्ये बेरोजगार होता. नोकरीच्या शोधात असताना त्याला रस्त्यावर बँकेत लिपिक, शिपाईपदाची भरती अशी जाहिरात दिसली आणि त्याखाली मोबाइल क्रमांक देण्यात आले होते. रितेशने यातील एका मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील तरुणाने वैभव असे नाव सांगितले. वैभव याने रितेशकडून अर्ज भरून घेतला आणि पॅनकार्ड, आधारकार्ड तसेच बँकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रांवर सह्या घेतल्या. काही दिवसांनी रितेशला पुन्हा फोन आला आणि व्हिडीओ कॉल करून समोर पॅनकार्ड आणि आधारकार्ड दाखविण्यास सांगण्यात आले. वैभवने रितेशला नोकरी पक्की झाली असून काही दिवसांत तू रुजू होशील, असे सांगितले. दिलेल्या कागदपत्रांवरून दोन बँकांमध्ये रितेशच्या नावाने खाते उघडण्यात आले होते.
अर्ज भरून तसेच कागदपत्रे जमा करून अनेक दिवस झाले, तरी नोकरीसाठी फोन येत नसल्याने रितेशने वैभवला संपर्क केला. त्याने प्रथम गावी आहे, तसेच इतर काही कारणे सांगून टाळाटाळ केली. संशयास्पद वाटत असल्याने रितेश दोन बँकांमध्ये गेला आणि त्याच्या नावे उघडण्यात आलेली खाती बंद केली. जवळपास वर्षभराने त्याला एक नोटीस आली. यामध्ये २३ कोटी ९९ लाख १९ हजार इतकी जीएसटी थकबाकी त्वरित भरण्यास सांगितले होते. रितेश याने माझगाव येथील जीएसटी भवन गाठून सद्यस्थिती सांगितली. त्याच्या नावे मॅजिक ब्युलियन रॉयल लिमिटेड ही कंपनी सुरू करून त्यावरून कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आल्याचे समोर आले. यासाठी रितेशच्या बनावट सह्यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे रितेशच्या तक्रारीवरून चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँक अधिकाऱ्यांचा हात?
रितेश प्रत्यक्षात कोणत्याही बँकेत गेला नसताना त्याच्या नावावर खाते उघडण्यात आले. इतकेच नाही, तर दीड-दोन वर्षांपासून सर्व आर्थिक व्यवहार त्याच्या बनावट सहीने करण्यात आले. विशेष म्हणजे केवायसीसाठी देण्यात आलेला मोबाइल क्रमांकही दुसऱ्याच व्यक्तीचा आहे. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे सर्व सुरू असल्याचा संशय असून यामध्ये त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.