आज जे लोक विचारात आहेत राम मंदिर तुमची खासगी मालमत्ता आहे का, तेच लोक मंदिर यही बनायेंगे, असे म्हणत होते. पण तारीख सांगत नव्हते. आम्ही मात्र मंदिरही उभारले, तारीखही सांगितली, ३७० ही हटवले. अटलजींना काही लोक तेव्हा हिणवत असत. तुमच्या किमान समान कार्यक्रमात राम मंदिर, ३७० कुठे आहे, तेव्हा अटलजी त्यांना म्हणाले होते, आज मी २२ पक्षांचे सरकार चालवतो आहे. पण आमच्या पक्षाचे सरकार येईल, तेव्हा हे होईल. तेव्हाच्या हिणवणाऱ्यांना उद्देशून फडणवीस यांनी हिंमत असेल तर २२ जानेवारीला प्रत्यक्ष या, मंदिर कसे उभारले आहे, ते दाखवून देऊ, असे सांगत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
संस्कृती प्रतिष्ठान आयोजित अटल संस्कृती गौरव पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका डॅा. प्रभा अत्रे आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक संचालक डॅा. प्रमोद चौधरी यांना अटल संस्कृती गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी अणुस्फोटांच्या बाबतीत असणारा जागितक दबाव झुगारून, आपल्या वैज्ञानिकांना अणुस्फोटाची परवानगी देणारे, देशातील चारही दिशांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोन महामार्ग उभारणारे अटल बिहारी वाजपेयी, हे खऱ्या अर्थाने नवभारताचे जनक होते, नवभारताच्या उभारणीची सुरवात त्यांनी केली, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
फडणवीस म्हणाले, ज्यांच्या कर्तृत्वाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे वाटावेत, अशा व्यक्तिमत्वांना अटलजींच्या नावाचा पुरस्कार देणे औचित्याचे आहे. प्रभाताईंच्या संगीतसेवेने कित्येकांना प्रेरित केले आहे. नादब्रह्म या संज्ञेची अनुभूती सर्वसामान्यांना ज्यांच्या स्वरातून मिळते, असा स्वर प्रभाताईंचा आहे. प्रमोद चौधरी यांची इथेनाल मन अशी सार्थ ओळख आहे. देशाची पहिली बायो फ्युएल पालिसी तयार करणार्या अटलजींच्या धोरणांचे मूर्त रूप चौधरी यांनी साकारले आहे.
अटलजी यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या नावाप्रमाणेच अटल आहे. त्यांनी जागतिक दबाव झुगारण्याचे सामर्थ्य दाखवले आणि देश अणुशक्तीसंपन्न केला. डागतिक निर्बंधांची पर्वा केली नाही कारण शक्तीशाली लोकच शांतीची स्थापना करू शकतात, यावर त्यांचा अटल विश्वास होता. त्यांच्या कवितेतूनही ही दृढता दिसते. देशातील प्रत्येक गावाशी संपर्क व्हावा, म्हणून त्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. त्याचा सुपरिणाम आपण अनुभवत आहोत. त्यांचे शब्द, कवित्व आणि व्यक्तित्व निराशेचून आशेकडे आणि प्रेरणदायी संघर्षाकडे नेणारे होते.