वंचित बहुजन आघाडीच्या मनुस्मृती दहन दिनानिमित्त स्त्री मुक्ती दिन परिषदेचे कस्तुरचंद पार्कवर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, उपाध्यक्ष निशा ठाकूर, प्रा. अंजली आंबेडकर, ज्येष्ठ समाजसेविका लीलाताई चितळे यांच्यासह वंचितच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीचा धागा पकडत आंबेडकर म्हणाले, ‘वंचितच्या उमेदवारांनी इतर कोणत्याही गोष्टींचा फारसा विचार न करता केवळ लोकसभा निवडणूकीत विजय कसा मिळवता येईल याचाच विचार करावा. जागा वाटप, किती जागांवर लढणार याची चर्चा करण्यापेक्षा उमेदवारांनी त्यांना निवडणूक कशी जिंकता येईल यासाठी प्रयत्न करावा. मग मते पैसे मोजून घ्यावी लागली, मैत्री करून मिळवावी लागली तरी चालतील. पण, जास्तीत जास्त मते मिळतील यासाठीच प्रत्येकाने प्रयत्न करावे. येणाऱ्या काळात जर फुले-शाहू-आंबेडकरवाद ही विचारसरणी लोकसभेत पोहचवायची असेल तर निवडणूक जिंकण्याची खुणगाठ बांधा’ असा सल्ला आंबेडकर यांनी यावेळी दिला.
इंडिया आघाडीचा भाग नसलेले आंबेडकर यांनी यावेळी आघाडी सोबत जाण्याचे सुतोवाच करताना, ‘मोदीला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडियाची स्थापना केली. मात्र, अजूनही ते पूर्णपणे एकत्र आलेले नाही. मी यापूर्वीही म्हटले आहे, मोदीला घालवायचे असेल तर आधी एकत्र या, कसे लढायचे यासाठी आम्ही आमचा भेजा देतो ना’ असे सांगत इंडियासोबत जाण्याचे संकेत दिले. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना आम्ही यांना सर्वप्रकारची मदत करायला तयार आहे. मात्र हे लोक आम्हालाच नुकसान पोहचवत असल्याचे सांगितले. त्यामुळे मोदीला पुन्हा देशावर राज्य करू द्यायचे नसेल तर एकत्र येणे, संघठित होऊन लढणे हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्त्री मुक्ती परिषदेत रेखा ठाकूर, लीलाताई चितळे, अंजली आंबेडकर यांचीही भाषणे झाली.
स्त्री मुक्ती दिन परिषदेसाठी मैदानात मोठा व्यासपीठ तयार करण्यात आला होता. या व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित असताना त्यामागे वंचितचा बॅकड्राप लावण्याचे काम सुरू होते. यासाठी काही लोखंडी खांब उभे करण्यात आले होते. स्टेजवर हे काम जवळपास पूर्ण झाले होते. मान्यवरांची भाषणे सुरू होती. अचानक बॅकड्रापचा एक खांब पडल्यानंतर स्टेजखालील इतर खांबही मागच्या बाजूस पडले. दरम्यान खांब पडले त्याठिकाणी कोणीही उभे नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, खांब पडल्याचे दिसताच प्रसारमाध्यमांचे छायाचित्रकार आणि कॅमेरामन स्टेजच्या मागच्या बाजूने धावले. त्यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी छायाचित्र काढण्यास रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद सुटला.