हायलाइट्स:
- ‘शिवकालात छत्रपती कुणाला म्हणायचे हे आजच्या महाराजांना आपण सांगायला पाहिजे’
- ‘एक छत्रपती कॉलर उडवतो तर दुसरा विचार विकून राज्यसभेचा खासदार होतो’
- इतिहास किती महत्वाचा आहे हे सांगताना संपादक ज्ञानेश महाराव यांची टीका
सोलापूर : आज राज्यात एक छत्रपती कॉलर उडवतो तर दुसरा विचार विकुन राज्यसभेचा खासदार होतो. अरे शिवकालात छत्रपती कुणाला म्हणायचे हे आजच्या महाराजांना आपण सांगायला पाहिजे अशा शेलक्या शब्दांत चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांचे कान उपटले आहेत.
सोलापुरातील समविचार सभा आयोजित कॉम्रेड संजय जोगीपेठकर लिखित ‘सोलापूरची दैदिप्यमान चळवळ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी ज्ञानेश महाराव हे सोलापूरात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ता म्हणून आपले विचार मांडले. त्यावेळी त्यांनी दैववाद, विज्ञानवाद, विवेकवाद अशी मांडणी करताना इतिहास किती महत्वाचा आहे हे सांगताना ही टीका केली आहे.
यावेळी बोलताना पूर्वी प्रत्येक राजकीय पक्षांकडे एक कामगार संघटनांची एक विंग असायची. त्यांचा राजकारणासाठी वापर मर्यादित वापर होत होता. पण आता ती परिस्थिती नाही. माणसांची डोकी गुलाम बनवून ती हत्यारांसारखी वापरली जातात. कारण माणसं भावनिक होतात अन त्यांचा दगड बनवला जातो. मग ही हत्यारे वापरणाऱ्या व्यवस्थेला डोकं असतं. तसंच काहीसं आज झालं आहे.
आज सर्वसामान्य माणूस हिंदुत्वाच्या नावाखाली गुलाम बनवला जात आहे. अशा चुकणाऱ्या माणसांना आता कुणी सांगायलाही जात नाही ही शोकांतिका आहे, असं महाराव म्हणाले. उदाहरणच द्यायचं झालं तर,नरेंद्र मोदींनी गंगेत खुशाल डुबकी मारावी पण सोनिया गांधींनी त्यांचं अनुकरण का करावं. विचार वारसा विसरली की माणसं अशी वागू लागतात असं म्हणत त्यांनी गंगास्नान आणि हातात गंडेदोरे बांधण्यावरून सोनिया गांधी यांनाही यावेळी लक्ष्य केलं.