हायलाइट्स:
- विदर्भात हवामान खात्याकडून चांगली बातमी
- आजपासून पावसाची शक्यता
- कधी कुठे होणार पाऊस?
अमरावती : विदर्भात गेल्या दीड आठवड्या पासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे पावसाने विश्रांती घेतली असल्याने भर पावसाळ्यात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांना भर श्रावण महिन्यात उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्यामुळे विदर्भात पोषक वातावरण तयार होऊन चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज विदर्भातील बहूतेक जिल्ह्यात बरेच ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर 30 ते 31 ऑगस्ट रोजी विदर्भात सार्वत्रिक पावसाचा अंदाज अमरावती हवामान तज्ञ अनिल बंड यांनी दिला आहे. आगामी तीन चार दिवसात विदर्भात बऱ्यापैकी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर आता शेतकऱ्यांना सुद्धा पावसाची आस लागली आहे. सोयाबीनला आता मोठ्या प्रमाणात फुलोरा आला आहे. त्यामुळे शेंगा आता भरण्यास सुरवात झाली आहे तर कपाशीला सुद्धा पावसाची गरज आहे. भर पावसाळ्यात गर्मीने जीवाची लाही होत असल्याने जीव कासावीस झाला आहे. त्यामुळे आजपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कधी कुठे होणार पाऊस?
कोकणात रत्नागिरी येथे रविवारपासून मंगळवारपर्यंत काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला जाणवेल. सिंधुदर्गात रविवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. ठाणे, रायगड येथे मंगळवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. पालघरमध्ये बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. तर मुंबईमध्ये मंगळवारी आणि बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, ठाणे येथे बुधवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल.
मध्य महाराष्ट्रात नाशिकमध्ये मंगळवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. जळगाव येथे सोमवारी आणि मंगळवारी, नंदुरबारमध्ये मंगळवारी आणि बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात मात्र सध्याच्या अंदाजानुसार पावसाचा जोर फारसा वाढणार नाही. राज्यात विदर्भ क्षेत्रामध्येही आठवडा अखेरीस पावसाचा जोर वाढलेला दिसेल. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने रविवारी विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.
दोन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
सोमवारी अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ तर मंगळवारी अकोला, नागपूर येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, लातूर येथे मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा अंदाज आहे. उस्मानाबादमध्येही रविवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. तर परभणीमध्ये सोमवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी तुरळक ठिकाणी पावसाचा जोर तीव्र मुसळधार स्वरूपाचा असू शकेल. औरंगाबाद, जालना येथेही सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मध्य व पश्चिम भारतातही
बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय वातस्थिती यामुळे पुढील चार ते पाच दिवस मध्य आणि पश्चिम भारतामध्ये पाऊस पडू शकेल. मान्सून ट्रफचे पश्चिमेकडील टोक येत्या ४८ तासांमध्ये त्याच्या दक्षिणेला सरकणार आहे. या परिस्थितीमध्ये राज्यासह ओडिशा, आंध प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान येथेही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.