मिळालेल्या माहितीनुसार, गोरख कचरू शिरसाट (४८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी (ता. २५) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पांगरी-सुरेगाव रस्त्यावरील पोल्ट्री शेडमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत शिरसाठ यांचा मृतदेह आढळला. यावेळी त्यांच्या पत्नीने समोरील दृश्य पाहून आरडाओरड केली. त्यावेळी आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेत मृतदेह खाली उतरवला. त्यांच्या पत्नीने घटनेची माहिती पोलिसांना कळवली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस ही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून दोडी येथील रुग्णालयात पाठविला शिरसाठ यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली. त्यात लिहिले की, सिन्नर व्यापारी बँकेचे दीड लाख कर्ज होते. त्यापैकी एक लाख कर्ज देणे आहे. बहुउद्देशीय बँकेचे दोन लाखांचे कर्ज आहे. एक लाख २० हजार रुपये भरावेत म्हणून सारखा तगादा सुरू असल्याचे नोटमध्ये लिहिले आहे. याच आर्थिक विवंचनेतून शेतकरी गोरख शिरसाट यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
मृत गोरख शिरसाट यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुले आहेत. त्यांचा एक मुलगा सिन्नरला खासगी कंपनीत कामाला जातो. तर दुसरा पोल्ट्री सांभाळतो. आर्थिक विवंचनेतून कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून सिन्नर तालुक्यातील शेतकरी गोरख शिरसाट यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शिरसाट कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.