संशयापोटी शाळकरी मुलाचा वडिलांनीच केला खून; पोलिस तपासात समोर आले धक्कादायक कारण

सातारा : हिवरे (ता. कोरेगाव) येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केला होता. याप्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनाच पोलिसांनी ४८ तासांत स्थानिक गुन्हे शाखा सातारा व वाठार पोलीस ठाणे यांनी कारवाई करत जेरबंद केले. विशेष म्हणजे या घटनेची फिर्याद संशयित आरोपी विजय आनंदराव खताळ (वय ३६) यांनी दिली होती. त्याला कॅन्सर असल्याचा संशय व मृत्यू पश्चात आपल्या मुलाचे कसे होईल या विवंचनेतून त्याने दोरीने गळा आवळून मुलाचा खून केल्याची कबुली दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, शनिवार २३ डिसेंबर रोजी मौजे हिवरे (ता. कोरेगाव, जि. सातारा) गावाच्या हद्दीत कुंभारकी नावाच्या शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ (वय १२) या शाळकरी अल्पवयीन मुलाचा कोणीतरी अज्ञाताने गळा आवळून खून केला असल्याची फिर्याद वाठार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

ही घटना गंभीर असल्याने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे विशेष पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपीस पकडण्याचे आदेश दिले होते. तसेच वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांचेही एक पथक तयार करून त्यांनाही या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते.

हिवरे (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथे गुन्हा घडल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे व वाठार पोलीस ठाण्याचे पथक मुलाच्या खुनासंदर्भात माहिती घेत होते. यावेळी मृत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरून व तेथील जवळपासच्या साक्षीदारांकडे केलेल्या विचारपूस व चौकशीवरून हा गुन्हा त्याच्या वडिलांनी केला असल्याचा संशय निर्माण झाला होता. मुलाच्या वडिलांनी दिलेली माहिती व इतर साक्षीदारांकडे दिलेली माहिती यात तफावत दिसून आली. त्यामुळे हा खून त्याच्या वडिलांनीच केला असल्याचा संशय अधिक बळकट झाला होता. त्यानुसार मृत मुलाच्या वडिलांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा खून केल्याची कबुली दिली.

हा खून संशयित आरोपीने त्याला कॅन्सर असल्याचा संशय व मृत्यू पश्चात आपल्या मुलाचे कसे होईल, त्याचा कोण सांभाळ करील, त्यालाही कॅन्सर होईल, त्याचे हाल होतील या विवंचनेतून त्याचा दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी अभिनंदन केले.

Source link

sataraSatara Crime Newsschool boy was killed by his fatherschool boy was killed by his father in sataraसातारा बातमी
Comments (0)
Add Comment