मिळालेल्या माहितीनुसार, सेनगावमधील तळणी गावच्या असलेल्या मथुराबाई पांडुरंग कोरडे (६५) या जानेवारी २०२० मध्ये आपल्या शेतात शेळ्या चालण्यासाठी गेलेल्या असताना सायंकाळी त्यांचा मृतदेह तळणी शिवारातील शेतात आढळून आल्याने एकच खरबळ उडाली होती. आरोपीने त्यांचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर त्यांच्या अंगावरील चांदीचे दागिने पळवले होते. दरम्यान या प्रकरणी नरसी नामदेव पोलीस स्टेशन अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल झालेला होता. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मागील चार वर्षांपासून या घटनेचा तपास सुरू ठेवला होता. मात्र यामध्ये आरोपीचा शोध लागत नव्हता.
या प्रकरणात पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे,नरसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. या संयुक्त पथकाने अधिक माहिती घेतली असता या महिलेचा खून हानगरी येथील असलेल्या २६ वर्षीय आरोपीने केला असल्याचे समोर आले. त्याचे नाव नागोराव सुखदेव शिरामे असं आहे. महिलेची हत्या नागोरावने केली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यानंतर या पथकाने नागोराव शिरामे यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली. यामधून त्याने या गुन्ह्याची कबुली दिली असून ४८ हजाराचा मुद्देमाल या आरोपीकडून पोलिसांनी जप्त केला आहे.
नागोराव शिरामे हा सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये सात गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तीन महिलांच्या अंगावरील दागिने पळविले असून जबरी चोरी फसवणुकीचे, गुन्हे घरफोडी अशा गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे.