आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रमुख पक्षांतील हालचालींना हळूहळू वेग येऊ लागला आहे. त्याचाच एक धागा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजोग वाघेरे-पाटील यांच्या भेटीला जोडला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी माजी पक्षनेते एकनाथ पवार यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून हाती शिवबंधन बांधले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष वाघेरे-पाटील यांनी हाती शिवधनुष्य घेण्याचे संकेत दिले आहेत. त्याच अनुषंगाने त्यांनी मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली. त्या वेळी खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते.
मावळचे लोकप्रतिनिधित्व शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे (शिंदे गट) करीत आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पराभूत करून निवडून आले आहेत; परंतु आता उपमुख्यमंत्री पवार आणि बारणे दोघेही महायुतीचे घटक आहेत. त्यामुळे पार्थ पवार किंवा बारणे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे इच्छुक वाघेरे-पाटील यांनी वेगळी वाट निवडण्याचा निश्चय केला आहे. ठाकरे गटातून उमेदवारी मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
मावळ लोकसभा अस्तित्वात आल्यापासून वाघेरे-पाटील यांनी उमेदवारीची आस होती. परंतु, २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी महापौर आझमभाई पानसरे यांना उमेदवारी मिळाली. त्या वेळी शिवसेनेकडून गजानन बाबर विजयी झाले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत बाबर यांच्याऐवजी शिवसेनेने बारणे यांना संधी दिली. आता २०२४ मध्ये होणार असलेल्या निवडणुकीतही बारणे उमेदवारीची आस बाळगून आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटातून उमेदवारीविषयी चाचपणी केली जात आहे. पिंपरी-चिंचवडमधून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार म्हणून वाघेरे-पाटील यांच्या नावाची चर्चा होऊ शकते. त्यामुळे लढतीत रंगत निर्माण होईल, असा दावा केला जात आहे.
वाघेरे-पाटील यांची पार्श्वभूमी
शहराचे द्वितीय महापौर भिकू वाघेरे-पाटील यांचे चिरंजिव असलेले संजोग वाघेरे-पाटील हे पिंपरी गावचे भूमिपुत्र आहेत. वडिलांपासून राजकीय वारसा घेतल्यानंतर १९९५ मध्ये संजोग वाघेरे-पाटील यांना महापौरपद भूषविण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर वाघेरे-पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक झाले. पालिकेच्या निवडणुकीत वाघेरे-पाटील यांच्या पत्नी उषा वाघेरे निवडून आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले. त्यानंतर वाघेरे-पाटील यांनी पक्षाचे शहराध्यक्षपदही सांभाळले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी दोन वेळा प्रयत्न केले. आता राजकीय भवितव्यासाठी वाट निवडणे गरजेचे वाटले. त्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. येत्या काही दिवसांत निर्णय घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहे.
संजोग वाघेरे-पाटील, माजी महापौर, पिंपरी-चिंचवड
Read Latest Maharashtra Updates And Marathi News