छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सेट’ विभागावर या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी होती. मात्र, ही प्रश्नपत्रिका ‘सेट-२०१९’च्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे जशीच्या तशी असल्याचे आढळले. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली होती. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने याबाबतचे वृत्त दिले होते.
त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ‘सारथी’, ‘बार्टी’ व ‘महाज्योती’ संस्थांचे प्रमुख ऑनलाइन उपस्थित होते. या बैठकीत रविवारी झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, ‘सेट’ विभागाकडून अनावधानाने २०१९च्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका रविवारी झालेल्या परीक्षेसाठी देण्यात आली. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या जानेवारी महिन्यात पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. त्याबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.
सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांची संशोधन अधिछात्रवृत्ती पात्रता परीक्षा पुन्हा घेण्याबाबत विद्यापीठात आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार जानेवारी महिन्यात ही परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येईल. याबाबतचे सविस्तर प्रकटन विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरात लवकर उपलब्ध करून दिले जाईल.
– डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ