‘एका मंत्र्याला खाऊन-पिऊन जामिनावर सोडले तरी भाजप थयथयाट करतोय आणि तिकडे…’

हायलाइट्स:

  • हरयाणात शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद
  • ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
  • भाजप सरकार निर्घृणतेची बीजे पेरत आहे – शिवसेना

मुंबई: केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या हरयाणातील शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. शिवसेनेनं याच मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘महाराष्ट्रात एका मंत्र्यास खाऊन-पिऊन जामिनावर सोडले तरी भाजप थयथयाट करतोय आणि तिकडं शेतकऱ्यांची डोकी फुटत असतानाही भाजप शांत आहे,’ अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे. ‘भाजप सरकार ज्या निर्घृणतेची बीजे पेरत आहे, त्याला कटू फळे आल्याशिवाय राहणार नाहीत,’ असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.

हरयाणात शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराचा शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. ‘अमृतसरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा सुरू असतानाच अगदी बाजूला हरयाणामध्ये शेतकऱ्याचे दुसरे ‘जालियनवाला बाग’ घडत होते, पण ना दिल्लीचे सरकार जागचे हलले ना महाराष्ट्रातील ‘जन आशीर्वाद’ यात्रेला हुंदका फुटला. देशातील शेतकऱ्यांनी उठाव करावा व बळीराजाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घ्यावा असे हे प्रकरण आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा: नारायण राणेंची आज पोलिसांसमोर पहिली हजेरी; पोलिस बंदोबस्त वाढवला

शिवसेनेनं या हल्ल्याच्या निमित्तानं नारायण राणे यांच्या अटकनाट्याची आठवण देत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्रासह अन्य राज्यांत पंतप्रधान मोदी प्रेरणेने ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरू असतानाच हरयाणात शेतकऱ्यांवर निर्घृण आणि अमानुष लाठीहल्ला झाला आहे. हा लाठीहल्ला साधा नाही. अंदाधुंद गेळीबारापेक्षा भयंकर आहे. अफगाणिस्तानात तालिबानी ज्या पद्धतीचा हिंसाचार घडवून माणसे मारीत आहेत, त्याच तालिबानी पद्धतीने हरयाणाच्या भाजप सरकारने शेकडो शेतकऱ्यांची डोकी फोडून भारतमातेची भूमी रक्ताने भिजवली आहे. शेतकऱ्यांची डोकी फोडणारं हरयाणा सरकार बरखास्त करून तिथं राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी आता कोणी करणार आहे काय?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे. ‘मोदी सरकारातील एक केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी देतो. त्याबद्दल त्याच्यावर ‘सूक्ष्म’ कायदेशीर कारवाई होताच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची बोंब ठोकणारे हेच लोक हरयाणातील रक्तबंबाळ शेतकऱ्यांचे चित्र पाहून गप्प आहेत,’ अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे.

हरयाणात शेतकऱ्यांवर लाठीमार

वाचा: ‘तुम्हाला शांत झोप लागतेच कशी?’; कोर्टाचा सत्ताधाऱ्यांना सवाल

Source link

Lathicharge on Haryanan FarmersSaamana editorialShiv Sena attacks BJPShiv Sena Attacks Bjp in Saamana EditorialShiv Sena News Todayशिवसेना वि. भाजपसामना अग्रलेख
Comments (0)
Add Comment