चुकीचा फेरफार करणाऱ्या तालठ्याचा जाहीर सत्कार केला जाणार; मयत शेतकऱ्याच्या पत्नीने छापलेली निमंत्रण पत्रिका व्हायरल

नांदेड: शासकीय अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग कसे करतात याचा प्रत्यय जिल्ह्यातील हिमायतनगर मध्ये आला आहे. आपल्या पदाचा दुरुपयोग करून एका तलाठ्याने चुकीचा फेरफार तयार केला. ही बाब उघडकीस आल्यानंतर एका शेतकरी महिलेने तलाठ्याच्या सत्कार करण्यासाठी चक्क सत्कार पत्रिका छापली. जाणीवपूर्वक चुकीचा फेरफार तयार करून माझ्या कपळावरचं कुंकू पुसून माझे लहान लहान लेकरं पोरके करणाऱ्या कर्तृत्वान इनामदार तलाठ्याचा भव्य सत्कार, अशा आशयाची पत्रिका पीडित महिलेने छापली असून समाज माध्यमावर ही पत्रिका व्हायरल झाली आहे.

जोत्सना जाधव यांचे पती परमेश्वर जाधव यांची हिमायतनगर शहराजवळ नऊ गुंठे जमीन होती. पण त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेत शेख इरफान आणि मिर्झा जुनेद या दोघांनी बनावट कागपत्रांद्वारे जमीन स्वतःच्या नावावर करुन घेतली. यासाठी त्यांना तलाठी दत्तात्रय पुणेकर आणि मंडळ अधिकाऱ्याने जमीनीचा चुकीचा फेरफार करुन दिला असा ज्योत्स्ना जाधव यांचा आरोप आहे. जमीन गेल्याने परमेश्वर जाधव यांनी २८ नोहेंबर रोजी आत्महत्या केली. पतीच्या आत्महत्येनंतर ज्योत्सना जाधव यांनी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. तसेच चुकीचा फेरफार केल्याची तक्रार देखील केल्यानंतर उप विभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी फेरफार रद्द केला. मात्र चुकीचा फेरफार करणाऱ्या तलाठ्यावर आणि मंडळ अधिकारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पीडित महिलेने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. अधिकाऱ्यांनी नवऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करून माझं घर उघड्यावर आणले. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल माझी अणि पोरक्या मुलांची इच्छा आहे की भर चौकात बँड लावून हिमायतनगर येथील तलाठ्याचा भव्य सत्कार करावा आणि यावेळी आपणही उपस्थित राहिलात तर आम्हाला अधिक आनंद होईल, असं निमंत्रण देणारी पत्रिकाचं छापली आहे.

सदरील पत्रिका सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल झाली असून, जिकडे तिकडे महसूल विभागाच्या आलबेल कारभाराची जोरदार चर्चा केली जाते आहे. यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. दरम्यान तिच्या या गांधीगिरीने समाज माध्यमातूनही चांगला पाठिंबा मिळाला असून तलाठ्याच्या या कृती बद्दल संताप व्यक्त होत आहे.

पत्रिकेत वेळ आणि ठिकाणाचा उल्लेख

या पत्रिकेवर खास करून सत्कारमुर्ती कर्तव्यदक्ष तलाठी दत्तात्रय शाहूराव पुणेकर यांचा सत्कार दि. ०३ जानेवारी २०२४ वेळ स. ११ वाजता ठिकाण हिमायतनगर बस स्टँड येथे आयोजित केल्याचं नमूद केले आहे. शेवटी निमंत्रण देणाऱ्या पीडित महिलेने विनीत म्हणून :- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची व पोरक्या मुलांची आई अश्या प्रकारे छपाई केली आहे.

Source link

NandedNanded crime newsnanded news todayTaltha felicitated card gone viralनांदेड ताज्या बातम्यानांदेड बातम्या
Comments (0)
Add Comment