‘स्मार्ट सिटी’ कार्यालयात डॉ. भागवत कराड यांनी पाणी पुरवठा योजनेच्या कामाची आढावा बैठक घेतली. बैठकीला पालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत, शहर अभियंता ए. बी. देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के. एम. फालक, विशेष कार्यअधिकारी एम. बी. काजी यांच्यासह कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जुन्या सातशे मिलिमीटर व्यासाच्या पाणी पुरवठा योजनेच्या बळकटीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. नऊशे मिलिमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी टाकून या योजनेचे बळकटीकरण केले जात आहे. नऊशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी या बैठकीत दिली. पंपहाउससाठी नवीन पंपांचीही ऑर्डर देण्यात आली आहे; पण हे पंप मिळण्यास उशीर होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये ही जलवाहिनी कार्यान्वित करण्यात अडचणी येतील, असा उल्लेख त्यांनी केला.
कोळी यांनी दिलेल्या माहितीनंतर, पालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘जलवाहिनीचे काम ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार होते, आता १५ जानेवारी कसे काय, सांगितले जात आहे. रात्रंदिवस काम करा आणि ३० डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करा असे ते म्हणाले. पंपहाऊससाठी पंप लवकर मिळावेत यासाठी आपण संबंधित कंपनीशी बोलू.’ दरम्यान, १४ फेब्रुवारीपासून शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू न झाल्यास कंत्राटदारांचे बिल रोखले जाईल असा इशारा डॉ. भागवत कराड यांनी दिला.
ऑर्डर दिल्यावरच निर्मिती
नऊशे मिलिमीटर व्यासाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १४५० अश्वशक्तीचे दोन पंप बसवण्यात येणार आहे. एका पंपाचे वजन सुमारे ८० टन आहे. हे पंप तयार नसतात, ऑर्डर दिल्यावर पंपांची निर्मिती केली जाते. त्यामुळे उशिराने पंप मिळतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.