काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या १३८व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या गुरुवार, २८ डिसेंबर रोजी ‘है तयार हम’ महारॅली होत आहे. दिघोरी येथील सभास्थळाला ‘भारत जोडो मैदान’ नाव देत पक्षाने राहुल गांधी यांच्या पदयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचाही मुहूर्त साधला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी नागपूर-विदर्भाचा राजकीय प्रांत नवा नाही. शेतकरी, सिंचन प्रकल्प असो, अन्यथा नाही तर, सामाजिक समीकरण याची बऱ्यापैकी माहिती त्यांना आहे. उभय नेत्यांच्या आजवर नागपूरसह विदर्भात अनेक सभा, पदयात्रा झाल्या. किंबहुना २००० साली १४ एप्रिल रोजी सोनिया गांधी यांनी ‘संविधान बचाव रॅली’तून केंद्रातील तत्कालीन वाजपेयी सरकारला इशारा दिला. त्याचा लाभ पक्षाला २००४च्या निवडणुकीत झाला व संयुक्त पुरोगामी आघाडीची सत्ता आली.
इंदिरांची प्रेरणा…
इंदिरा गांधी यांनीदेखील आणीबाणीमुळे सत्ता गमावल्यानंतर पवनार येथे आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाला भेट देत कार्यकर्त्यांमधील निराशा झटकून काढली. पुढे त्याच विश्वासाने त्यांनी सत्तेत दमदार पुनरागमन केले होते. जुन्या कार्यकर्त्यांनी अद्यापही या स्मृती हृदयाच्या कप्प्यात जपल्या आहेत. पक्षाला या भूमीतून यश मिळाल्याने विदर्भाला नमन करण्याची परंपरा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी जोपासली. भारत जोडो यात्रेदरम्यान मात्र कार्यक्रमात बदल करून संतनगरी शेगाव येथे राहुल गांधी यांची जंगी सभा झाली. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर प्रियांका गांधी पहिल्यांदाच येत आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी विश्वासू शिलेदारांकडून विदर्भातील काही जागांची माहिती घेतल्याचे आजही बोलले जाते. तीन मोठी भाषणे होणार असल्याने प्रियांका यांचे भाषण होणार का, हे अद्याप ठरलेले नाही. कार्यकर्त्यांना मात्र, त्यांच्या भाषणाचीही उत्सुकता आहे.
बैठक नाही फक्त भाषणे
महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेस कार्यसमितीची सेवाग्राम येथे बैठक झाली होती. यात तीन ठराव संमत करण्यात आले. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कार्यसमितीतील सर्व सदस्यांसह देशभरातील पक्षाचे नेते एकत्र येत असले तरी, कुठलीही बैठक नाही. गांधी कुटुंबीयांचे भाषण मुख्य राहणार आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कोणता संदेश देतात, याकडे नेते व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News