जागतिक पातळीवर ३० संशोधकांच्या चमूने हे संशोधन केले असून यामध्ये भारतीय संशोधक डॉ. जो निनान यांचा समावेश आहे. डॉ. निनान सध्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये कार्यरत आहेत. मोठ्या ग्रहाच्या शोधासंदर्भात डॉ. निनान यांनी माहिती दिली.
बटुताऱ्यांच्या भोवती स्वतःची ग्रहमाला असते; मात्र आतापर्यंतच्या वैज्ञानिक ठोकताळ्यांनुसार बटुताऱ्यांभोवती इतका मोठा ग्रह असणे अपेक्षित नव्हते. त्यामुळे हा ग्रह कसा तयार झाला, या संदर्भातही आता संशोधनाची शक्यता आहे. ‘एलएचएस३१५४’ हा बटुतारा असून संशोधनातून समोर आलेल्या ग्रहाला ‘एलएचएस३१५४बी’ असे नाव देण्यात आले आहे. ही बटुताराप्रणाली पृथ्वीपासून ५० प्रकाशवर्षे दूर आहे. तिचा केंद्रीय तारा अत्यंत अंधुक आहे. याचे वस्तुमान सूर्याच्या ११ टक्के आहे, तर सूर्याच्या तुलनेत केवळ ०.१ टक्के प्रकाश हा बटुतारा उत्सर्जित करतो. या बटुताऱ्यापासून त्याचा ‘एलएचएस३१५४बी’ हा ग्रह आपला सूर्य आणि पृथ्वी यामधील अंतराच्या सुमारे दोन टक्के एवढ्या अंतरावर आहे आणि तो केवळ ३.७ दिवसांमध्ये त्याच्या केंद्रीय बटुताऱ्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो. या निमित्ताने बटुताऱ्यांभोवताली असलेल्या ग्रहांच्या निर्मितीबाबतही काही प्रश्न निर्माण झाले आहेत.
संशोधकांच्या चमूने विशेष वर्णपटमापक (स्पेक्ट्रोमीटर) तयार करून तो अमेरिकास्थित १० मीटर व्यास असलेल्या हॉबी एबरले दुर्बिणीला जोडला. हे उपकरण ताऱ्याच्या अवरक्त (इन्फ्रारेड) वर्णपटातील सूक्ष्म बदल टिपण्यास सक्षम आहे – डॉ. जो निनान, अवकाश संशोधक
जीवसृष्टीची शक्यता कमी
हॅबिटेबल झोन प्लॅनेट फाइंडर म्हणून हे उपकरण संबोधले जाते. या उपकरणाच्या साह्याने केलेल्या संशोधनामध्ये हा ग्रह आढळून आल्याची माहिती त्यांनी दिली. हा ग्रह वायूचा गोळा असू शकतो; तसेच हा जीवसृष्टी सक्षम नसावा, असाही अंदाज आहे. ‘एलएचएस३१५४बी’ आणि ‘एलएचएस३१५४’ यांच्या वस्तुमानाचे गुणोत्तर प्रचलित सिद्धांतापेक्षा अधिक आहे, असेही या संशोधनाद्वारे समोर आले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News