सक्रांत जवळ येऊ लागताच मुंबईच्या आकाशात वेगवेगळ्या रंगाचे पतंग दिसू लागतात. परंतु ही पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. या धोकादायक मांजामुळे या कालावधीतअनेक पक्षी, प्राणी जखमी होतात, तर काही मृत्युमुखी पडतात. हे कापलेले धागे पतंगांसोबत जमिनीवरच राहतात आणि ते विघटनशील नसतात. त्यामुळे गटारे अडवणे, ड्रेनेज लाइन, नद्या, नाले यांसारखे नैसर्गिक पाण्याचे मार्ग, माती यावर विपरीत परिणाम होतात. पडलेले धागे कापून पडल्यामुळे गुरेढोरे, गायी आणि इतर प्राणी नायलॉनसह अन्नपदार्थ खातात. त्यामुळे राज्य सरकारने १९८६च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार या मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली. तरीही या मांजाची विक्री आणि वापर सर्रास सुरू आहे.
संक्रातीला पंधरापेक्षा अधिक दिवस शिल्लक असतानाच मुंबईचे आकाशात पंतग दिसू लागले आहेत. जनजागृती आणि कारवाईचा इशारा पोलिसांकडून दरवर्षी दिला जातो. मात्र म्हणावी तशी प्रभावी कारवाई प्रतिबंधिक मांजा विक्री करणाऱ्यावर, वापरणाऱ्यावर होत नाही. मात्र यावर्षी रविवारी मांजामुळे झालेल्या समीर जाधव यांच्या मृत्यूनंतर पोलिस कमला लागले असून कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
… या ठिकाणी कारवाई
बांगूरनगर : गोरेगाव पश्चिमेकडील शहीद भगतसिंग नगर-१ मध्ये एका खोलीवर छापा टाकण्यात आला. सुमारे साडेतीन हजार रुपयांचा मांजा हस्तगत करीत पोलिसांनी कुसुमदेवी मंडल हिच्यावर गुन्हा दाखल केला.
मालवणी : नायलॉन मांजा गुंडाळलेल्या २७ चक्री (फिरकी) आणि ३९० पाऊच हस्तगत करीत खालिद शेख या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल.
सहार : अंधेरी पूर्वेकडील आरती जनरल स्टोअर्समधून कैलास महादे याला ताब्यात घेऊन नायलॉन मांजाच्या १० चक्री हस्तगत केल्या.
दिंडोशी : मालाड येथील सक्सेरिया चाळीतून करण सहानी यांच्याकडून सुटी आणि नायलॉन मांजा हस्तगत करण्यात आला.
…. या कलमांतर्गत गुन्हे
नायलॉन किंवा चिनी मांजा वापरणाऱ्यांवर आदेश उल्लंघनप्रकरणी कलम १८८, मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने कृती केल्याप्रकरणी भादंवि कलम ३३६ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तिघांवर गुन्हा
पोलिस कॉन्स्टेबल समीर जाधव यांच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पतंग उडविणाऱ्यांवरही नजर ठेवली जात आहे. पोलिसांनी पश्चिम द्रुतगती महामार्गावर पतंग उडविणाऱ्या मनोज काटकर आणि महेश काटकर या भावांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चिनी मांजा सापडला. तसेच पोलिसांनी हा मांजा विक्री करणाऱ्या अहमद हुसेन जाहिद काझी याला ताब्यात घेतले. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात करून त्यांना अटक करण्यात आली.