हायलाइट्स:
- सायकलींची चोरी करणारी टोळी जेरबंद
- पोलिसांनी केली कारवाई
- तिघांच्या टोळीत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश
सांगली : सांगली शहरासह परिसरात महागड्या सायकलींची चोरी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली. तिघांच्या टोळीत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून दोन लाख रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या २१ सायकली जप्त केल्या आहेत. तसंच वॉन्लेसवाडी येथील शाळेतील कॉम्पुटर चोरीचाही गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आशिष संजय कांबळे (वय २०, रा. वॉन्लेसवाडी) आणि ऋतेश रमेश गायकवाड (वय १८, रा. बेथेलहेमनगर) या दोघांना अटक केली असून अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक सांगलीत चोरी, घरफोडी या गुन्ह्यांतील संशयितांची तपासणी करत होते. त्यावेळी पथकातील संतोष गळवे, अनिल कोळेकर यांना माहिती मिळाली की, वानलेसवाडी येथे दुर्गामाता मंदीराजवळ काही तरुण सायकलसह थांबले असून, त्यांच्याजवळ असलेल्या पोत्यामध्ये कॉम्प्युटर आहेत. ते विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दुर्गामाता मंदिराजवळ जाऊन आशिष कांबळे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. दोघांकडे फॅटम व क्रिस्टो कंपन्यांच्या १६ हजार रुपये किमतीच्या दोन सायकलींसह पिशवीत दोन कॉम्प्युटर सेट मिळाले. तसंच त्यात दोन मॉनिटर, दोन सीपीयू व एक कीबोर्ड असा एकूण ३७ हजारांचा मुद्देमाल मिळाला.
संशयित आशिष कांबळे याच्या चौकशीत त्यानं सांगितलं की, १८ ते २० दिवसांपूर्वी त्याचे साथीदार ऋतेश गायकवाड व यशराज दुधाळ यांच्यासह वॉन्लेसवाडी येथील प्राथमिक शाळेतून दोन कॉम्प्युटर सेटसह दोन मॉनिटर, दोन सीपीयू व एक कीबोर्ड असे साहित्य चोरले. त्यांच्याकडे मिळालेल्या फॅटम व क्रिस्टो सायकली बाबत विचारपूस करता त्याने सांगितले की, दत्तनगर व सावकर कॉलनी या ठिकाणाहून फॅटम व क्रिस्टो सायकल चोरली आहे. अधिक चौकशीत संशयितांनी सांगली शहरासह परिसरात २१ सायकलींची चोरी केल्याची कबुली दिली.
चोरलेल्या सायकली सांगली-मिरज रोडवरील मैत्रेय या बंद असलेल्या इमारतीत ठेवल्या होत्या. सपोनि प्रशांत निशानदार यांनी पथकासह बेथेलनगर येथून रुतेश रमेश गायकवाड (वय १८) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली केली. त्याने सायकली चोरल्याची कबुली दिली. अटकेतील संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निरंजन उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, संदीप पाटील, संदीप गुरव, संकेत मगदूम, अनिल कोळेकर, हेमंतकुमार ओमासे, सागर टिंगरे, संतोष गळवे आणि सुहेल कार्तीयानी यांच्या पथकाने केली.