धुक्यामुळे पुणे ते दिल्ली चार विमाने रद्द; पुण्याहून एकूण ९ विमानांची उड्डाणे रद्द

पुणे: दिल्लीतील दाट धुक्याचा फटका सलग दुसऱ्या दिवशी पुणे ते दिल्ली विमान सेवेला बसला. दिल्लीतील दाट धुक्यामुळे गुरूवारी पुणे ते दिल्ली दरम्यानची चार उड्डाणे रद्द करण्यात आली. तर, इतर काही विमानांना एक तासांपर्यंत उशीर झाला. पुण्यातून सुटणारी एकूण नऊ उड्डाणे रद्द झाल्यामुळे सुट्टीचे नियोजन केलेल्या प्रवाशांना फटका बसला.

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत दाट धुके पडत आहे. त्यामुळे तेथील विमानांच्या वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे. दिल्लीमध्ये पहाटे पासून ते दुपारपर्यंत धुक्याचा परिणाम राहत आहे. त्यामुळे बुधवारी सहा ते सात विमानांना उशीर झाला होता. गुरुवारी तर वेगवेगळ्या कंपन्यांची चार विमाने धुक्क्यामुळे रद्द करण्यात आली. तर इतर पाच ते सहा विमानांना साधारण अर्धा ते एक तासांचा उशीर झाला. प्रामुख्याने पहाटे पासून ते दुपारी बारापर्यंतच्या विमानांना यामध्ये समावेश आहे. धुक्यामुळे दोन दिवसांपासून पुणे दिल्ली आणि दिल्ली पुणे विमानांचे वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

पुण्यातून दिल्लीसाठी सर्वाधिक विमाने धावतात. या मार्गावर वेगवेगळ्या कंपन्यांच्या साधारण १५ पेक्षा जास्त विमान सेवा आहेत. पण, दोन दिवसांपासून सकाळच्या टप्प्यातील काही विमानांना उशीर होत आहे. तर काही विमाने रद्द होत आहेत. त्यामुळे कामाच्या निमित्ताने दिल्लीला जाणाऱ्या व दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या नागरिकांच्या खूपच अडचणी झाल्या आहेत. अनेकांच्या महत्वाच्या मिटिंग व कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.

गोव्याला जाणारी दोन विमाने रद्द
पुणे विमानतळावरून दिल्लीबरोबरच इतर शहरात जाणारी विमाने गुरूवारी सकाळी रद्द करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने अमृतसर, लखनऊ आणि हैदराबाद जाणारी प्रत्येकी एक विमान रद्द झाले. तर गोव्याला जाणारी दोन विमाने रद्द झाली. खराब हवामानामुळेच ही विमाने रद्द झाल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Source link

flights cancelledflights cancelled due to fogPune Airportधुक्यामुळे विमाने रद्दपुणे
Comments (0)
Add Comment