हायलाइट्स:
- मानसोपचार तज्ज्ञाला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी
- जमावाने परिसरात माजवली दहशत
- पोलिसांनी ५२ जणांवर दाखल केले गुन्हे
सांगली : इस्लामपूर शहरातील ओंकार कॉलनी येथे मानसोपचार तज्ज्ञ कालिदास पाटील यांच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसंच घरातील वस्तूंची तोडफोडही केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. कोयता, हॉकीस्टिक व काठ्या हातात घेऊन जमावाने परिसरात दहशत माजवली. दुचाकी, कॉम्प्युटर, सीसीटीव्ही आणि दरवाजाच्या काचा फोडून तब्बल ५ लाख रुपयांचं नुकसान करण्यात आलं आहे.
याप्रकरणी कालिदास पाटील यांच्या फिर्यादीनुसार माणिक मोरे, जयदीप मोरे यांच्यासह ५० अनोळखी इसमांवर इस्लामपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
इस्लामपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९ मध्ये कालिदास पाटील यांनी प्रदीप अग्रवाल यांच्याकडून साडेतीन गुंठे जमीन विकत घेतली होती. त्या जागेवर इमारत उभारून कंपाऊंड केले होते. कंपाऊंडच्या दक्षिणेला असणारी १५ बाय ६० फुटांची मोकळी जागा कालिदास पाटील यांच्या मालकीची आहे. परंतु ही जागा वडिलोपार्जित असून आम्ही त्या जागेचे मूळ मालक आहोत, असं माणिक व जयदीप मोरे यांचं म्हणणं आहे.
सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कालिदास पाटील यांच्या घराबाहेर अचानकपणे ३० ते ४० जणांचा जमाव जमला. त्यांनी आरडाओरडा करत घरातील व परिसरातील वस्तूंची तोडफोड केली. पाटील यांच्या क्लिनिकमध्ये माणिक मोरे, जयदीप मोरे यांच्यासह सुमारे ५० जणांनी हातामध्ये कोयता, हॉकीस्टिक व काठ्या घेऊन तोडफोड केली. पाटील यांच्या कंपाऊंडला लावलेले लोखंडी गेट जमावाने तोडलं. तसंच आवारातील दोन दुचाकींची मोडतोड केली आणि झाडांच्या कुंड्याही फेकून दिल्या.
दरम्यान, डॉक्टर कुठे आहे, त्याला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी यावेळी देण्यात आली आहे. या प्रकाराने परिसरात दहशत निर्माण झाली असून कालिदास पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.