या प्रकरणातील टोळीत सहभागी असलेल्या महिलेने मे महिन्यामध्ये कोपरखैरणे परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीशी फेसबुकवरून मैत्री करून, त्याच्याशी अश्लील संभाषण करून त्याला जाळ्यात ओढले होते. त्यानंतर या महिलेने स्वत: विवस्त्र होऊन तक्रारदार व्यक्तीलाही तसे करण्यास भाग पाडले होते. यादरम्यान महिलेने व तिच्या सहकाऱ्यांनी तक्रारदार व्यक्तीचे हे व्हिडीओ रेकॉर्ड केले. त्यानंतर त्याचे अश्लील व्हिडीओ युट्युबवर अपलोड करण्याची भीती दाखवून त्याच्याकडून ४३ लाख २२ हजार रुपये उकळले होते.
नवी मुंबईच्या सायबर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजाजन कदम, पोलिस उपनिरीक्षक रोहित बंडगर, पोलिस शिपाई भाऊसाहेब फटांगरे, महिला पोलिस शिपाई पूनम गडगे व त्यांच्या पथकाने तक्रारदाराने ज्या बँक खात्यांमध्ये रक्कम पाठवली होती, त्या बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीची माहिती मिळवली. त्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने राजस्थान पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन हलीम याला राजस्थान, उत्तर प्रदेश सीमेवरील पालदी या दुर्गम ठिकाणावरील गावातून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून अनेक मोबाइल फोन, विविध मोबाइल कंपन्यांचे सिमकार्ड, विविध बँकांचे एटीएम कार्ड्स जप्त केले आहेत. तसेच, या बँक खात्यातून चार लाख १२ हजार रुपयांची रक्कम गोठविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. या आरोपीचा महाराष्ट्र व भारतातील विविध राज्यांत दाखल असलेल्या अशाच प्रकारच्या १३ तक्रारींमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सावधगिरी बाळगा
टेलिग्राम, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍप तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी लोकांकडून येणाऱ्या मेसेजवर उत्तर देऊ नये. तसेच, अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या मेसेजना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल नेहूल यांनी केले आहे.