मतदारयादीत मृतांची नावे नकोच! नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, अन्यथा ग्रामसेवकांना जबाबदार धरणार

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा गतीने कामाला लागली आहे. मतदार यादी अचूक असण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. मृत नागरिकांची नावे मतदार यादीत राहणार नाही यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवकांना जबाबदार धरण्यात येईल. चुकीने देखील अशी नावे राहणार नाही यासाठी मृत मतदारांचा शोध घेऊन नावे काढून टाकण्यासाठी निवडणूक विभागाला मदत करावी’, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम पुढील वर्षात घोषित होईल. तत्पूर्वी, जिल्हा प्रशासनाने आजपासूनच इलेक्शन मोडमध्ये येऊन कामाला सुरुवात करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बचत भवन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे आदी उपस्थित होते. आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील मतदारांची संख्या वाढवणे, निवडणुकांमध्ये अधिकाधिक पारदर्शिता, आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, गतिशील कामे यासोबतच राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपले दायित्व पूर्ण करावे, अशी सूचना डॉ. इटनकर यांनी केली.

मतदार जागृतीच्या संदर्भातील उपक्रमाचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांना घोषित करण्यात आले. त्यांना सर्व विभागाने मदत करावी, यावर्षी नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व निवडणुकांमध्ये विक्रमी मतदान व्हावे व युवकांचे मतदान सर्वात अधिक असावे याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांना जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. यामध्ये गती आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अधिकाऱ्यांच्या पदोन्नती परीक्षेत अनेक घोळ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
४ जानेवारीपर्यंत मनुष्यबळाची माहिती द्या

आगामी निवडणुका संदर्भात वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे. या समित्यांचे सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. विभागवार आढावा घेण्यात आला. निवडणुकीसाठी मनुष्यबळ उपलब्ध न करणाऱ्या विभागांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. प्रामुख्याने शिक्षण, पंचायत समिती व जिल्हा स्तरावरील काही विभागांनी अद्याप आपले मनुष्यबळ कळवले नाही. सर्व विभाग प्रमुखांनी ४ जानेवारीपर्यंत मनुष्यबळ कळविण्याचे स्पष्ट करण्यात आले.

बहाणे करू नका

निवडणुकीच्या वेळेस नेमणुकांमध्ये बदल करणे, जागा बदलून मागणे, दिलेल्या जागेवर काम करण्यास असमर्थता दर्शविणे, आरोग्याचे वेगवेगळे कारण सांगणे, अशा प्रकारचे अनेक अर्ज कर्मचाऱ्यांकडून येत असतात. मात्र यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. निवडणुकीचे कार्य हे राष्ट्रीय कार्य असून त्याकडे तेवढ्याच सकारात्मकरित्या कर्मचाऱ्यांनी बघावे, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

Source link

election commission of indiaNagpur newsनागपूर जिल्हाधिकारीनागपूर ताज्या बातम्यालोकसभा निवडणूक २०२४विधानसभा निवडणुका २०२४
Comments (0)
Add Comment