हायलाइट्स:
- विदर्भातील सहा जिल्ह्यांत २४ तासांत नवा बाधित नाही.
- दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपुरात शून्य रुग्ण.
- बुलडाण्यात २० नवे रुग्ण आढळल्याने चिंता मात्र कायम.
चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असून बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी जिल्ह्यात एकही करोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. मागील २४ तासांत जिल्ह्यात ७ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, चंद्रपूर सोबतच भंडारा, अकोला, यवतमाळ, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांतही २४ तासांत नवीन एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.( Coronavirus In Vidarbha Latest News )
वाचा:राज्यात करोना रुग्णसंख्येमध्ये घट; तिसऱ्या लाटेचा धोका असतानाच…
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६४२ वर पोहचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ६० झाली आहे. सध्या ४२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ७३ हजार २१५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५ लाख ८२ हजार ७७७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५४० बाधितांचे मृत्यू झाले आहेत.
वाचा:करोनाची तिसरी लाट रोखणार; मुंबई महापालिकेचा हा ‘अॅक्शन प्लान’ तयार
बुलडाण्यात रुग्णसंख्येत वाढ
विदर्भात सोमवारी दिवसभरात तपासण्यात आलेल्या अहवालांमध्ये ३१ नवे बाधित आढळले. यातील २० रुग्ण एकट्या बुलडाणा जिल्ह्यात आढळल्याने चिंता वाढली आहे. जिल्हानिहाय रुग्णसंख्येत नागपूर चार, गडचिरोली चार, अमरावती दोन तर वाशीममध्ये एक रुग्ण वाढला आहे. भंडारा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा शून्य रुग्णाची नोंद झाली. या वाढीव आकड्यांमुळे विदर्भातील एकूण रुग्णसंख्या ११ लाख १८ हजार १९१ वर पोहचली. यातील १० लाख ९८ हजार २४० बरे झाले तर २१ हजार २३७ दगावले आहेत.
वाचा:ईडीची कारवाई: जयंत पाटील यांनी भाजपवर केला ‘हा’ गंभीर आरोप