या प्रकरणी कमलेश कुशावह यांची पत्नी मिठाना कमलेश कुशावह (वय ४५ वर्षे, रा. नवाबगंज, जिल्हा उन्नाव, उत्तर प्रदेश. हल्ली तांबटकर मळा, पारिजात चौक, गुलमोहर रोड, नगर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, पती कमलेश, मुलगा दीपक, गोपाल, सनी व मुलगी अंजली असे एकत्र राहतो.
कुटुंबासह सुमारे चार वर्षापासून अहमदनगर येथे कामानिमित्ताने राहात असून गावाकडील चांद आलमनुर आलम खान यांच्याकडे सिमेंट ब्लॉक व कंपाउंड तयार करण्याचे काम करत आहेत. सोबत आणखी काही मजूरही कामाला आहे. त्यामधे गावाकडील आझाद खान, संदीप कुमार, रामबाबु सिंग, अक्रम असे कामावर आहेत. सुमारे सात-आठ महिन्यापासून बिंदाप्रसाद कालीदीन रावत हा सुध्दा पती कमलेश सोबत काम करत आहे. कमलेश हे गावाकडील मुलांना इथे कामावर लावत असून ते ठेकेदार आहेत. त्यामुळे बिंदाप्रसाद कालीदिन रावत याने पतीकडून कामाचे आगाऊ पैसे घेतलेले होते.
२८ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता भावाचा फोन आल्याने मी व माझे पती आम्ही भाच्यासोबत बोलत होतो. तेव्हा बिंदाप्रसाद कालीदीन रावत तेथे आला व मोठ्याने बोलू लागला तेव्हा पती कमलेश त्याला म्हणाले, आम्ही फोनवर बोलत आहोत. तू शांत बस. तेव्हा बिंदा हा कमलेशला शिवीगाळ करु लागला. तेव्हा कमलेश याने बिंदा यास तुला आमच्याकडे काम करायचे नाही तर तू आगाऊ घेतलेले पैसे देवुन टाक, असे म्हणाले तेव्हा बिंदाप्रसाद हा कमलेशला मारु लागला.