पुणे रेल्वे विभागात पुणे ते लोणवळा आणि पुणे ते दौंड या दोन मार्गांवर लोकल सेवा सुरू आहे. पैकी पुणे ते लोणावळा दरम्यान दररोज ४० लोकल धावतात. पुणे ते दौंड मार्गावर ‘मेमू’च्या माध्यमातून लोकल सेवा सुरू आहे. या दोन्ही मार्गांवरील लोकल सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात शिवाजीनगर येथून लोणावळ्यासाठी सुरू केलेल्या सेवेला प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे या मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे.
उत्पन्नात पाच कोटींची वाढ
पुणे विभागात गेल्या वर्षभरात दोन कोटी नऊ लाख सात हजार प्रवाशांनी लोकल प्रवास केला आहे. त्यातून रेल्वेला १३ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी (२०२२) दीड कोटी प्रवाशांनी लोकल प्रवास केला. त्यातून विभागाला नऊ कोटी ३३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत लोकलचे प्रवासी वाढल्यामुळे उत्पन्नात पाच कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
दौंड मार्गाला उपनगरीय दर्जा?
पुणे ते दौंड या मार्गावरून कामगार, विद्यार्थी आणि व्यापारी मोठ्या संख्येने प्रवास करतात. मात्र, या मार्गावर लोकल सेवा नसल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे मिळेल त्या गाडीने प्रवास करण्याची वेळ येते. दौंड, पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी, लोणी, मांजरी ही गावे पुण्याला अगदी चिटकून असल्याने तेथून पुण्यात कामासाठी आणि शिक्षणासाठी शहरात येणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या मार्गाला पुण्याचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे, पुणे ते दौंड दरम्यान उपनगरीय (ईएमयू) सेवा चालू करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
दुपारी लोकलसेवा कधी?
पुणे-लोणावळा मार्गावर दुपारच्या वेळी लोकलच्या फेऱ्या नसल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांचे हाल होत आहेत. सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजून ५० मिनिटे या दरम्यान लोकल बंद असते. रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी या काळात रेल्वे मार्ग बंद ठेवला जातो. वारंवार मागणी करूनही दुपारच्या वेळी लोकल सुरू नसल्याने प्रवासी वैतागले आहेत. तिसरी आणि चौथी रेल्वे लाइन कार्यान्वित झाल्याशिवाय दुपारी लोकल सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.
लोकलचे प्रवासी अन् उत्पन्न
वर्ष प्रवासी उत्पन्न
२०२२ एक कोटी ५६ लाख ~ नऊ कोटी ३३ लाख
२०२३ दोन कोटी नऊ लाख ~ १३ कोटी १८ लाख