वाढत्या जलप्रदूषणामुळे मासे मिळण्याचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये घटत चालले आहे. त्यात पर्सियन नेटच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या मासेमारीमुळे समुद्रातील मासे मिळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. परप्रांतीय हायस्पीड नौकांची घुसखोरीमुळे मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात आता एलईडी दिव्यांच्या सहाय्याने मासेमारी होऊ लागली आहे.
या प्रकारच्या मासेमारीमध्ये बोटींवर एलईडी दिवे नेले जातात. ते समुद्रात पाण्यावर लावण्यात येतात. या दिव्यांच्या प्रकाशाकडे मासे आकर्षित होतात. त्यांना जाळीमध्ये पकडण्यात येते. मोठे मासे पाण्यात पकडले जातात तर जाळ्यामध्ये येणारे छोटे मासे पुन्हा पाण्यामध्ये फेकून दिले जातात. पूर्वी काहीवेळा लहान मासे पाण्यात पुन्हा फेकून दिले जात होते. आता मात्र हे लहान मासेही बोटीमध्ये साठवले जातात. त्यांची साठवणूक करून खत बनवण्याचा कच्चा माल म्हणूनही वापर केला जातो. मोठे मासे मिळत नसल्याने हे लहान मासेही आता जाळ्यातून सुटत नाहीत. जितकी छोटी मासळी मिळेल, तितकी जाळ्यात पकडली जाते किंवा पुन्हा समुद्रात टाकून दिली जाते. त्यातील बहुतांश मासळी मरून जाते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांचे अतोनात नुकसान होते, याकडे मच्छिमार बांधव समीर कोळी यांनी लक्ष वेधले.
अनेक माशांच्या प्रजाती नष्ट
या प्रकारच्या मासेमारीमुळे अनेक माशांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहे. तारली, बोंबील, बांगडा, कोळंबी यासारख्या प्रजातींची संख्या आता कमी होत चालली आहे. भविष्यात तीस ते पस्तीस टक्के मासे कमी होण्याच्या मार्गावर आहेत. त्यासंदरभात सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे.
कायद्याची प्रभावी अमलबजावणी व्हावी
अनधिकृत एलईडी दिव्यांच्या सहाय्याने होणाऱ्या मासेमारीला प्रतिबंध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने कायदा करूनही त्याची प्रभावी अमलबजावणी अद्याप झालेली नाही. रात्रीच्या वेळी एलईडी दिव्यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मासळीची लूट सुरू आहे. यासंदर्भात सातत्याने लक्ष वेधूनही सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही, अशी खंत मच्छिमार राजहंस टपके यांनी व्यक्त केली.
Read Latest Maharashtra News And Marathi News