टाटा कॅन्सर स्मारक केंद्राचे नवनिर्वाचित संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये ज्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत, तितक्याच सक्षम सुविधा या केंद्रांमध्ये उपलब्ध असतील. इथे लागणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठीचा प्रस्तावही पाठवण्यात आला असून, त्यातील बहुतांश जागांसाठी मान्यता मिळाली आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयाकडे येणारी रुग्णसंख्या सातत्याने वाढती आहे. हा ताण कमी करण्यासाठी रुग्णालयाच्या खारघर येथील ‘अॅक्ट्रेक’ रुग्णालयामध्ये आता अधिक रुग्णांना उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
‘नव्या प्रमुख केंद्रांमध्ये शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, पॅथालॉजी, रेडिओलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, कोम्पोनेंट थेरपीचा समावेश असणार आहे. कॅन्सरसाठी योग्यवेळी वैद्यकीय निदान होणे, अत्यंत गरजेचे असते. उत्तम प्रकारच्या पॅथॉलॉजी सुविधेसह कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच काही प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश या केंद्रांमध्ये असणार आहे. पुढील १० ते १५ वर्षांमध्ये २४ लाख रुग्णसंख्येची नोंद होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातील ज्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचे विमाकवच मिळणार नाही, त्यांच्यासाठी सार्वजनिक यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे’, असे ते म्हणाले.
टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या सहकार्याने वाराणसी येथे कॅन्सर रुग्णालयाची सुरुवात झाल्यानंतर चार वर्षांमध्ये २२ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे तिथून मुंबईमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या फार कमी झाली नसली तरी ज्या रुग्णांचे निदान यापूर्वी होत नव्हते ते तिथे झाले. नव्या प्रमुख केंद्रामध्येही निदानामधून सुटणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या होतील, असा विश्वास डॉ. गुप्ता यांनी व्यक्त केला.
‘अॅक्ट्रेक’मध्येही रेडिओआयसोटोपने उपचार
सध्या टाटा कॅन्सर रुग्णालयाने रुग्णांवर रेडिओआयसोटोपने उपचार केले जातात. ही सुविधा आता खारघर येथील ‘अॅक्ट्रेक’ सेंटरमध्येही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी येथे रेडिओलॉजिकल रिसर्च युनिटची स्थापना करण्यात आली आहे. स्वतंत्रपणे बांधलेल्या या युनिटमध्ये रेडिओआयसोटोप उपचार प्रणालीसाठी ४० हॉट बेड तयार करण्यात आले आहेत. नव्या वर्षात ही सुविधा सुरू होणार आहे. कृत्रिम प्रज्ञाच्या (एआय) मदतीने रुग्णांचे वैद्यकीय अहवाल, स्कॅन रिपोर्टस, पॅथालॉजीमधील अहवाल यांचे जतन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. गुप्ता यांनी दिली.
आयुर्वेदिक उपचारपद्धतीचा अभ्यास
कॅन्सर आयुर्वेदिक उपचाराने प्रतिबंधित करण्यात येतो, असा दावा सातत्याने केला जातो. मात्र त्यासाठी कोणत्याही प्रकारची शास्त्रोक्त माहिती दिली जात नाही. त्यामुळे खोपोली येथे टाटा कॅन्सर रुग्णालयाने विविध आयुर्वेदिक संस्थाच्या सहकार्याने सुरू केलेल्या केंद्रामध्ये हा अभ्यास करण्यात येणार आहे. वनविभागाने दिलेल्या जमिनीवर आयुर्वेदिक वनस्पती लावण्यात येणार असून, त्यांच्या गुणधर्माचाही अभ्यास करण्यात येणार असल्याचे डॉ. गुप्ता यांनी यावेळी सांगितले.